Lok Sabha Elections 2024 : आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्यातील १३ जागांसाठी मतदान होत असून, यामध्ये मुंबईतील सर्व सहा जागांचा समावेश आहे. बॉलिवूड कलाकारांपासून ते क्रिकेटपटूंनी आज मतदानाचा हक्क बजावला. भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुन तेंडुलकरसह मतदान केले. यावेळी माध्यमांशी बोलताना सचिनने सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले.
सचिन तेंडुलकर म्हणाला की, मी निवडणूक आयोगाचा राष्ट्रीय आयकॉन आहे. मतदानाबद्दलची जागरुकता वाढवण्यासाठी आणि मतदानाचे महत्त्व पटवून सांगण्यासाठी मी अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होतो. समस्या दोन कारणांमुळे उद्भवतात, एक म्हणजे जेव्हा तुम्ही विचार न करता कार्य करता आणि दुसरे म्हणजे जेव्हा तुम्ही कृती न करता केवळ विचार करत राहता तेव्हा. मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की, सर्वांनी आपले मतदान करावे. कारण हे आपल्या देशाच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
दरम्यान, आज सोमवारी पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये मुंबईच्या सहा आणि ठाणे, कल्याण तसेच नाशिकसारख्या प्रतिष्ठित जागांचा समावेश आहे. पहिल्या चार टप्प्यात मतदान घटल्याचे पाहायला मिळाले. याचा फटका कोणाला बसतो हे येत्या ४ जून रोजी स्पष्ट होईल. त्यामुळे अधिकाधिक मतदान होण्यासाठी आयोगासह उमेदवार अन् राजकीय पक्ष देखील कामाला लागले आहेत.
पाचव्या टप्प्यात कोणकोणती राज्ये?बिहार (५), झारखंड (३), महाराष्ट्र (१३), ओडिशा (५), उत्तर प्रदेश (१४), पश्चिम बंगाल (७), जम्मू-काश्मीर (१) लडाख (१)