सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. सोमवारी २० मे रोजी देशभरात पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. हा टप्पा राज्यातील शेवटचा असून, यामध्ये मुंबईतील सर्व सहा जागांचा समावेश आहे. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगापासून राजकीय पक्ष काम करत आहेत. नवमतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आयोगाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. अशातच भारतीय संघाचा माजी खेळाडू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या शैलीत मतदारांना खास आवाहन केले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'च्या माध्यमातून सचिन तेंडुलकरने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. तो म्हणाला की, एखाद्या सामन्यामध्ये प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमीच जिंकेल असे काही नाही. पण, लोकशाहीत हे असेच घडत असते. अर्थात लोकांनी ज्याला सर्वाधित मतदान केले असते त्याचा विजय होत असतो. म्हणूनच आपण लोक म्हणून किती सामर्थ्य आहे हे दाखवूया... चला मतदान करूया.
दरम्यान, सोमवारी पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये मुंबईच्या सहा आणि ठाणे, कल्याण तसेच नाशिकसारख्या प्रतिष्ठित जागांचा समावेश आहे. पहिल्या चार टप्प्यात मतदान घटल्याचे पाहायला मिळाले. याचा फटका कोणाला बसतो हे येत्या ४ जून रोजी स्पष्ट होईल. त्यामुळे अधिकाधिक मतदान होण्यासाठी आयोगासह उमेदवार अन् राजकीय पक्ष देखील कामाला लागले आहेत.
पाचव्या टप्प्यात कोणकोणती राज्ये?बिहार (५), झारखंड (३), महाराष्ट्र (१३), ओडिशा (५), उत्तर प्रदेश (१४), पश्चिम बंगाल (७), जम्मू-काश्मीर (१) लडाख (१)