मुंबई : मी खोटे बोलणार नाही. माझ्यावर थोडे दडपण आहे. आयपीएलमध्ये काहीही सोपे नाही. येथे गुणतालिकेत स्थान सहजपणे मिळत नसल्याने आम्हाला धडा घ्यावा लागेल, अशी कबुली लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल याने पराभवानंतर दिली.
रविवारी राजस्थान रॉयल्सकडून २४ धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर फलंदाजांना अधिक जबाबदारी स्वीकारावी लागेल, असे राहुल म्हणाला. लखनौने यंदा प्रथमच सलग दोन सामने गमावले. यामुळे पहिल्या दोन स्थानावर झेप घेण्याच्या शक्यतेला धक्का लागला. लखनौचा अखेरचा साखळी सामना बुधवारी सीएसकेविरुद्ध होईल. सामन्यानंतर राहुल म्हणाला, १७९ धावांचा पाठलाग करतेवेळी आम्ही २९ धावांत तीन फलंदाज गमावले. यामुळे मधल्या फळीवर दडपण आले. मार्क्स स्टोयनिसला तळाच्या स्थानावर पाठविण्याच्या निर्णयाचे कारण सांगताना राहुल पुढे म्हणाला, परिस्थितीनुसार आमच्या खेळाडूंचा सर्वोत्कृष्ट वापर व्हायला हवा. मार्क्स आक्रमक फलंदाज आहे. अखेरच्या षटकापर्यंत काय केले पाहिजे हे त्याला माहिती आहे. त्यामुळे आम्ही त्याला उशिरा फलंदाजीसाठी पाठविले. दुसऱ्या टोकाहून त्याला साथ देणारा फलंदाज असायला हवा.
आघाडीच्या फळीने अधिक जबाबदारीने खेळून स्टोयनिस आणि जेसन होल्डरसारख्या फलंदाजांसाठी व्यासपीठ तयार करण्याची संघाला गरज आहे. राजस्थान संघ लखनौविरुद्ध विजयामुळे आघाडीच्या दोन स्थानांच्या शर्यतीत आहे. त्यांचा एकही फलंदाज अर्धशतक ठोकू शकला नाही तरी संघाने बलाढ्य धावसंख्या उभारली. रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन म्हणाला, आमच्या संघाचे हेच वैशिष्ट्य आहे. लखनौविरुद्धच्या विजयावर नजर टाकाल तर प्रत्येक फलंदाजाने १०-२० धावांचे योगदान दिले असे दिसून येईल. सांघिक बळावर आम्ही यशस्वी होत आहोत.