Join us  

लोकेश राहुलला अंतिम संघामध्ये स्थान नको!: रवी शास्त्री, आशिया चषक संघ निवडीपूर्वी मोठे विधान

भारताने अद्याप आशिया चषकासाठी संघ जाहीर केलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 10:24 AM

Open in App

नवी दिल्ली :  आशिया चषक २०२३ मध्ये लोकेश राहुलची थेट अंतिम एकादशमध्ये निवड करणे योग्य होणार नाही, असे विधान माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले. आयपीएलमध्ये मांडीला दुखापत झाल्यानंतर राहुल त्यानंतर स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. अशावेळी पुनरागमन करताच त्याच्याकडून कामगिरीची अपेक्षाही बाळगता येणार नसल्याचे शास्त्री यांनी म्हटले आहे. 

भारताने अद्याप आशिया चषकासाठी संघ जाहीर केलेला नाही.  ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालावधीत स्पर्धेचे आयोजन हायब्रीड मॉडेलनुसार पाकिस्तान आणि श्रीलंकेत होईल. वृत्तानुसार निवडकर्ते राहुल आणि श्रेयसला संघात स्थान देण्याच्या विचारात आहेत. हे दोघेही सध्या एनसीएत पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. राहुलला आयपीएलदरम्यान दुखापतीवर शस्त्रक्रिया पार पडली. त्याने नुकताच नेट्समध्ये सराव सुरू केला; पण आशिया चषकात अंतिम एकादशमध्ये तो फलंदाजी करू शकेल का, याबाबत शास्त्री यांना शंका वाटते.

एका चर्चेत शास्त्री म्हणाले, ‘राहुल अनेक महिन्यांपासून खेळलेला नाही. दुखापतीतून सावरत आहे. आशिया चषकात अंतिम एकादशमध्ये त्याला खेळविण्याचा निर्णय म्हणजे, तुम्ही त्याच्याकडून काहीशी अधिकच अपेक्षा बाळगत आहात, असे होईल. एखादा खेळाडू दुखापतीतून सावरल्यानंतर त्याच्या हालचाली मंदावतात. कालांतराने तो स्थितीशी समरस होतो.’

आगामी आशिया चषक आणि त्यानंतर रंगणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी रवी शास्त्री यांनी भारतीय संघाला तीन डावखुरे फलंदाज खेळविण्याचा सल्ला दिला आहे. शास्त्री म्हणाले, ‘फलंदाजी क्रमवारीत तीन डावखुरे फलंदाज खेळवले पाहिजेत असे वाटते. निवडकर्त्यांची भूमिका मोलाची ठरणार आहे, कारण ते खेळाडूंवर नजर ठेवून आहेत. खेळाडूंच्या फॉर्मची त्यांना कल्पना आहे. जर तिलक वर्मा चांगल्या फॉर्ममध्ये आहे, तर त्याला संधी द्या. जर यशस्वी जैस्वाल चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय, तर त्याला खेळवा.’ शास्त्री पुढे म्हणाले की, ‘जर गेल्या ६-८ महिन्यांपासून इशान किशनसाठी प्रयत्न होत असतील आणि तो यष्टिरक्षणही करणार असेल, तर कोणत्याही परिस्थितीत त्याची निवड झाली पाहिजे. काहीही असो संघात किमान दोन डावखुरे फलंदाज पाहिजे. जडेजाच्या समावेशाने आघाडीच्या सातपैकी तीन फलंदाज डावखुरे असावेत.’

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघरवी शास्त्री
Open in App