दुबई : सलामीवीर लोकेश राहुल याच्या खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरोधात पहिल्या कसोटीत ११३ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात तो प्लेअर ऑफ द मॅचदेखील ठरला होता. त्यामुळे आयसीसीच्या ताज्या कसोटी रँकिंगमध्ये १८ स्थानांनी फायदा मिळाला आहे. या यादीत राहुल ३१व्या स्थानावर पोहोचला. सेंच्युरिअनमध्ये या विजयाने भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ही मालिका विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा भाग आहे, तर अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने गोलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान कायम राखले आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स दुसऱ्या स्थानी कायम आहे.
राहुल याचे या प्रारूपातील सर्वोत्तम रँकिग ८ होते. हे रँकिंग त्याने नोव्हेंबर २०१७ मध्ये मिळवले होते. त्याने पहिल्या डावात १२३ धावा केल्या आणि मयांक अग्रवाल (६० धावा) याच्यासोबतच ११७ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. भारत या स्थळावर कसोटी सामन्यात विजय मिळवणारा पहिला संघ बनला. भारताने डब्लुटीसी गुणतक्त्यात महत्त्वपूर्ण गुण मिळवले आहेत. अग्रवाल यालादेखील एका स्थानाचा लाभ मिळाला, तर अजिंक्य रहाणे दोन स्थानांनी वर गेला आहे. त्याने बुधवारी २५वे स्थान मिळवले.
जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह हा नवव्या स्थानावर पोहोचला आहे, तर आठ बळी घेणारा मोहम्मद शमी याने १७वे स्थान मिळवले आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर हा १४व्या स्थानावर पोहोचला आहे. तेम्बा बावुमा याने १६ स्थानांनी उडी घेत ३९वे स्थान गाठले, तर मार्को जेन्सन याने ९७व्या स्थानासोबतच रँकिंगमध्ये प्रवेश केला आहे.