मुंबई : कॉफी विथ करण -6 या कार्यक्रमात के. एल. राहुल आणि हार्दिक पंड्या यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. त्यानंतर बीसीसीआयने त्यांच्यावर कडक कारवाई केली होती. पण काही दिवसांनी बीसीसीआयने त्यांच्यावरील निलंबन मागे घेतले. या निलंबनानंतर राहुल हा पहिल्यांदाच मैदानात उतरला होता.
भारत-अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यामध्ये आज एकदिवसीय सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने सह विकेट्स राखून विजय मिळवला. लायन्सने प्रथम फलंदाजी करताना ओलिव्हर पोपच्या 65 धावांच्या जोरावर 8 बाद 221 अशी धावसंख्या उभारली. भारतीय संघाकडून वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने चार बळी मळवत भेदक मारा केला.
भारतीय अ संघाने लायन्स संघाच्या 222 धावांचा सहज पाठलाग केला. भारताकडून रिषभ पंतने नाबाद 73 धावांची धडाकेबाज खेळी साकारली, त्याला दीपक हुडाने नाबाद 47 धावांची खेळी साकारत सुयोग्य साथ दिली. या दोघांनी अभेद्य भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
निलंबनानंतर राहुलचा हा पहिलाच सामना होता. त्यामुळे राहुलवर साऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना राहुलचे अर्धशतक हुकले. राहुलला यावेळी 42 धावा करता आल्या.