सौरभ गांगुली लिहितात...
भारतीय संघ एका नव्या मालिकेला सामोरे जात असताना विजयाचा दावेदार मानला जात आहे. गेल्या दीड वर्षापासून सुरू झालेली विजयाची ही शृंखला वर्षभर सुरू राहील, यात मला तरी शंका वाटत नाही. न्यूझीलंड संघ कसोटी मालिकेत ढेपाळला, पण वन-डे मालिकेत भारताविरुद्ध दोन हात करण्यात हा संघ लढवय्या वृत्ती दाखवू शकतो. दुस-या सराव सामन्यात बोर्ड एकादशला हरविल्याने या संघामध्ये विश्वासाचा संचार झाला असेल.
आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघामध्ये फरक आहे. न्यूझीलंडचे फिरकी गोलंदाज आॅस्ट्रेलियन गोलंदाजांच्या तुलनेत अधिक टिच्चून मारा करतात. त्यांचे चेंडू ‘टर्न’ व्हायला लागले तर मधल्या षटकांत गडी बाद करू शकतात. आॅस्ट्रेलियन फिरकीपटूंना हे तंत्र जमले नव्हते.
रॉस टेलरने सराव सामन्यात शतक ठोकल्यामुळे तो फॉर्ममध्ये परतल्याबद्दल संघव्यवस्थापन खूश आहे. टेलर, गुप्टिल आणि विल्यम्सन यांच्या कामगिरीच्या बळावर न्यूझीलंड संघ भारतापुढे आव्हान उभे करू शकेल. मागच्या मालिकेत पाहुण्या संघातील फलंदाज भारतीय वेगवान मा-याविरुद्ध बरेच भक्कम वाटले, पण फिरकीपुढे त्यांची चांगलीच दमछाक झाली होती. आधीच्या अनुभवातून या फलंदाजांनी काही धडा निश्चित घेतला असावा. कसोटी मालिकेत आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाचे फलंदाज भारतीय फिरकीपुढे अक्षरश: नांगी टाकत होते, हे क्रिकेट विश्वाने पाहिलेच आहे. हा अनुभव डोक्यात ठेवूनच न्यूझीलंडने भारतात पाय ठेवला असावा. त्यामुळेच फिरकीचा सामना करताना विकेट हातात असाव्यात, हे तंत्र पाहुण्या संघासाठी लाभदायी ठरेल. सलामीचा सामना रविवारी वानखेडे स्टेडियमवर होत आहे. येथील खेळपट्टी काहीशी उसळी घेणारी असल्याने मालिकेची सुरुवात योग्य स्थळापासून होत असल्याचे माझे मत आहे.
भारतीय संघ बलाढ्य असून सातत्य राखणारे खेळाडू अंतिम एकादशमध्ये राहतील. पण लोकेश राहुलला वगळल्याचे आश्चर्य वाटले. आॅस्ट्रेलिया असो वा श्रीलंका, दोन्ही संघातील वेगवान गोलंदाजांना त्याने यशस्वीपणे तोंड देत धावा खेचल्या आहेत. टी-२० तही सातत्यपूर्ण खेळ करतो. तो भविष्याचा खेळाडू आहे. तीन-चार वन डेत तो अपयशी ठरला हे मान्य आहे पण राहुल अप्रतिम क्षमता असलेला प्रतिभावान खेळाडू असल्याचे माझे वैयक्तिक मत आहे. निवडकर्त्यांनी त्याचा शक्य तितक्या लवकर संघासाठी विचार करायला हवा. द. आफ्रिका दौ-यावर जाण्याआधी भारताला न्यूझीलंडनंतर लंकेविरुद्ध खेळायचे आहे. सध्या उमेश यादव आणि शमी यांना स्थानिक क्रिकेट खेळण्यासाठी मोकळे करण्यात आले आहे. पण या दोघांनी वन-डेत खेळावे, असे मला वाटते. ब्रेक द्यायचा झाल्यास बुमराह आणि भुवनेश्वर यांना द्या पण उमेश आणि शमी यांना पूर्ण सामन्यात खेळवायला हवे. भारताला पुढील १५ महिने विजयात सातत्य राखायचे झाल्यास दोन तीन नव्हे तर संपूर्ण पाच भेदक गोलंदाजांची गरज आहे, हे विसरून चालणार नाही. (गेमप्लान)
Web Title: Lokesh Rahul wanted the team, Saurav Ganguly's opinion
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.