मुंबई - कसोटी क्रिकेटपटूचा ठपका असलेला भारताचा सलामीवीर लोकश राहुलला आयपीएल 2018 लिलावात मोठी किंमत मिळाली आहे. 2 कोटी रुपये बेस प्राईस असलेल्या राहुलचा भाव वाढत जाऊन 11 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबने 11 कोटी रुपयांना विकत घेतले. सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतही राहुलने फारशी उत्साहवर्धन कामगिरी केलेली नाही.
वनडे, टी-20 पेक्षा कसोटी मालिकेत त्याची कामगिरी उजवी आहे. तरीही आयपीएलमधल्या फ्रेंचायजींनी राहुलवर विश्वास दाखवला आहे. राहुलने 22 कसोटी सामन्यात 1442 धावा केल्या आहेत. त्यात चार शतक आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. 10 वनडे सामन्यात राहुलच्या नावावर एक शतक आणि एका अर्धशतक आहे. बारा टी-20 सामन्यात एक शतक आणि तीन अर्धशतक त्याच्या नावावर आहेत.
भारतीय संघात प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न करणा-या करुण नायरची बेस प्राईस 50 लाख रुपये होती. पण त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबने 5.6 कोटी रुपयांना विकत घेतले. करुण भारतासाठी अजून एकही टी-20 सामना खेळलेला नाही. तो भारतासाठी फक्त दोन वनडे आणि 6 कसोटी सामने खेळला आहे.