लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पहिल्या कसोटीत ७१ चेंडूत केवळ २० धावा काढणाऱ्या उपकर्णधार लोकेश राहुलला दुसऱ्या कसोटीत खेळवायला हवे? चाहत्यांच्या मनातील प्रश्नावर दिग्गजांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादने राहुलची निवड म्हणजे ‘पक्षपात’(फेव्हरिटिझम) असे संबोधले. त्यावर सुनील गावसकर यांनी राहुलला आणखी एक संधी मिळायला हवी, असे सांगून राहुलची पाठराखण केली. ‘फ्लॉप’ ठरूनही कसोटी संघातील नियमित खेळाडू असलेल्या राहुलला दिल्ली कसोटीत खेळवायला हवे, असे गावसकर यांना वाटते. त्याचवेळी शुभमन गिलसारखा खेळाडू राखीव बाकावर असल्याचेही त्यांचे मत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी गावसकरांना चांगलेच धारेवर धरले.
एक युजर म्हणाला, ‘राहुलला किती काळ झेलणार? राहुल नाव असणे यशाची गॅरंटी आहे काय? दुसऱ्या युजरने लिहिले, ‘बाहेरचा रस्ता दाखविण्याऐवजी त्याला कर्णधार नेमण्याच्या विचारात आहात! पृथ्वी शॉ सारख्यांचे काय होणार?’ अन्य एक जण लिहितो, ‘आयुष्यात मी कधी असा पक्षपात पाहिलेला नाही. राहुल पुढील मालिकेतही देशासाठी सलामीला खेळेल, असेच वाटत आहे.’