रोहित नाईक : आपल्या झंझावाती फलंदाजीने क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने गुरुवारी नवी मुंबईतून आपल्या नव्या इनिंगची सुरुवात केली. इंग्लंडच्या मिडलसेक्स क्लबच्या सहाय्याने सचिनने आपल्या ‘तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमी’चा शुभारंभ केला असून याद्वारे तो नवोदित खेळाडूंना क्रिकेटचे धडे देणार आहे. विशेष म्हणजे या अकादमीमध्ये सचिनने मुख्य प्रशिक्षक म्हणून आपला बालपणीचा मित्र विनोद कांबळीकडे सोपविली आहे. यामुळे सचिन - विनोद या दिग्गज विश्वविक्रमीजोडीकडून शिकण्याची सुवर्णसंधी नवोदित खेळाडूंना मिळणार आहे. यावेळी सचिन तेंडुलकरने ‘लोकमत’चे क्रीडा पत्रकार रोहित नाईक यांच्याशी केलेली ही खास बातचीत...
मिडलसेक्स क्लबसोबत करार करण्याचा उद्देश काय?- मिडलसेक्सला त्यांचा स्वत:चा १५४ वर्षांचा मोठा इतिहास आहे. त्यांनी अनेक जागतिक दर्जाचे खेळाडू क्रिकेटविश्वाला दिले आहेत. जेव्हा आपण फलंदाजीला जातो तेव्हा मोठ्या भागीदारीसाठी तेवढ्याच ताकदीचा किंवा क्षमतेचा साथीदार लागतो आणि मिडलसेक्स तसाच एक उत्कृष्ट साथीदार आहे.
या अकादमीमध्ये नवोदितांना खेळापलिकडे कोणती शिकवण मिळणार?- येथे नक्कीच चांगले खेळाडू घडवायचे आहे. पण यापलिकडे म्हणायचे झाल्यास माझ्या वडिलांनी जो संदेश दिला तो मला भावी पिढीला द्यायचा आहे. माझे वडिल म्हणायचे की, या सर्व गोष्टी काही काळापुरता मर्यादित आहेत. पण आपला स्वभाव आपल्यासोबत कायम राहणार आहे. त्यामुळे एक चांगला माणूस बनणे सर्वात महत्त्वाचे आहे. मलाही तोच संदेश या भविष्यातील पिढीला द्यायचा आहे. दुसºयाचे यश कशाप्रकारे साजरा करावा तसेच, एखादा खराब दिवस कसा मागे टाकायचा हे शिकवायचे आहे.
प्रशिक्षक म्हणून विनोद कांबळीवर किती मोठी जबाबदारी आहे?- विनोद एक प्रशिक्षक म्हणून फलंदाजीमद्ये खूप मोठे योगदान देऊ शकतो. तो त्यात माहिर आहे. मुलांसोबत त्याचे संबंध खूप खेळीमेळीचे आहे. पण मस्तीच्या वेळी मस्ती आणि क्रिकेटच्या वेळी फक्त क्रिकेटकडेच लक्ष द्यावे लागेल आणि ही बाब तो नक्कीच गांभिर्याने पाळेल. त्याच्या या अकादमीमधील उपस्थितीने खूप चांगले वाटते. त्याचा अनुभव आणि त्याचे कौशल्य या मुलांसाठी अमूल्य असेल. विनोदसह मिलिंद गुंजाळ, संतोष झिरे, प्रदीप सुंदरम, यांसारखे माझ्याविरुद्ध आणि माझ्यासह खेळलेले माजी खेळाडूही येथे प्रशिक्षण देणार असल्याने खेळाडूंना मोठी संधी असेल.
भारतात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी नेमकी कशाची गरज आहे?- कोणत्याही खेळाला वर येण्यासाठी प्रोत्साहन आणि पायाभूत सुविधांची नितांत गरज आहे. या दोन्ही गोष्टी खेळाडूंसाठी ‘परफेक्ट टॉनिक’ असेल. यामुळे त्यांना मैदानावर अतिरिक्त घाम गाळण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. कोणत्याही खेळाडूसाठी प्रोत्साहन किंवा पाठिंबा महत्त्वाचे असते. त्यामुळे चांगले सुविधा, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन या तीन गोष्टींमध्ये आपण सुधारणा केली, तर नक्कीच चित्र बदलेल.
अकादमी सुरु करत असताना आचरेकर सरांची प्रतिक्रीया काय होती?- सर खुश होते. ते कधीच फार बोलत नाही, पण त्यांच्या हास्यावरुन त्यांच्या मनातील सर्व भावना कळत होत्या. आत्ताच नाही, तर दरवेळेला अगदी लहानपणापासून सामन्याआधी सरांचे आशिर्वाद घेऊन पुढे गेलोय. ही गोष्ट माझ्या अखेरच्या सामन्यापर्यंत कायम राहिली. याशिवाय माझ्या आयुष्यात जे काही महत्त्वाचे क्षण आले, तेव्हा तेव्हा मी सरांचे आशिर्वाद आवर्जुन घेतले आहे. काल मी आणि विनोद खूप वर्षांनी एकत्र सरांकडे गेलो होतो. याहून दुसरी सर्वोत्तम गोष्ट असू शकत नाही.
धोनीला टी२० संघातून डावलले गेले आहे. यावर काय सांगशील?- मी निवडप्रक्रीयेवर कधीच कुठलेही मत व्यक्त केले नाही. कोणाला ठेवायचे आणि काढायचे हे सर्व निवडकर्त्यांवर अवलंबून असते. निवडकर्त्यांना त्यांचे काम माहित आहे आणि धोनीलाही माहित आहे की काय करायचे आहे. धोनीकडे खूप मोठा अनुभव आहे. शिवाय धोनीसह कर्णधार, प्रशिक्षक यांनी एकत्रितपणे २०१९ विश्वचषक स्पर्धेची योजना ठरवली असणार यात शंका नाही. देशासाठी सर्वोत्तम योगदान कसे देता येईल हेच या सर्वांचे लक्ष्य आहे. जर खरंच यामुळे सकारात्मक निकाल मिळणार असेल, तर पुढे जायलाच पाहिजे. त्यामुळे मला यावर फार काही बोलायचे नसून देशासाठी चांगले कार्य करण्यास पुढे जात रहावे.
छायाचित्र : संदेश रेणोसे.