ओव्हल : वर्ल्ड कप स्पर्धेत आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होत आहे. हा सामना पाहण्यासाठी अनेक भारतीयांनी लंडनमधील ओव्हल मैदानात हजेरी लागली आहे. यातच भारतीय बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेल्या मद्यसम्राट विजय माल्ल्याने सुद्धा हा सामना पाहण्यासाठी हजेरी लावली आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पाहण्यासाठी जात असतानाचे विजय माल्ल्याचे फोटो एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटरवर पोस्ट केले आहेत. यावेळी, मी सामना पाहण्यासाठी आलो आहे, असे सांगत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास विजय माल्ल्याने नकार दिला.
दरम्यान, आजच्या सामन्यात भारताला तिसऱ्यांदा विश्वविजेता बनविण्याच्या मार्गातील पहिले मोठे आव्हान ऑस्ट्रेलियाकडून मिळणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या या महत्त्वाच्या सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि कोच रवी शास्त्री यांच्या डावपेचांची कठोर परीक्षा असेल. भारताने वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात द. आफ्रिकेला सहा गड्यांनी सहज नमविले. दुसरीकडे गेल्या दोन महिन्यांत खेळात सुधारणा घडवून आणणा-या ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध व्यावसायिकवृत्तीच्या बळावर विजय साजरे केले.
काय आहे विजय माल्ल्या प्रकरण?देशातील बँकांचे जवळपास 9 हजार कोटींचे कर्ज विजय माल्ल्याने बुडविले आहे. विजय माल्ल्याचे सध्या लंडनमध्ये वास्तव्य आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय तपास यंत्रणांनी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टात गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सुरू आहे.