अहमदाबाद : भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने प्रदीर्घ कालावधीपासून विक्रमाबाबत विचार करण्याचे सोडले आहे. भारतातर्फे खेळताना उपयुक्त योगदान देण्यासाठी तो सध्या केवळ आपल्या कौशल्यावर मेहनत घेत आहे. अश्विन इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान ४०० बळींचा पल्ला गाठणारा चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे. आगामी वर्षांत त्याला अनिल कुंबळे यांच्या ६१९ बळींच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे, असे विचारले असता अश्विन म्हणाला,‘जर व्यावहारिक रूपाने बघितले हा विक्रम केवळ २१८ बळी दूर आहे. पण, मी प्रदीर्घ कालावधीपासून याबाबत विचार करणे सोडले आहे.’
मैदानात उतरल्यानंतर मी चांगला क्रिकेटपटू होण्याचा प्रयत्न करतो, असे सांगत अश्विन म्हणाला, ‘मी काय करू शकतो, यापेक्षा चांगले कसे करता येईल, याला जास्त महत्त्व आहे. जेव्हा संघात येतो आणि केवळ कसोटी क्रिकेट खेळत आहे, तर महत्त्वाची बाब म्हणजे पुनरागमन करताना संघात योगदान देणे आवश्यक आहे.’अश्विन इंडियन प्रीमिअर लीगपासून बायो बबलचा भाग आहे. तो त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आणि आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळत आहे. कुटुंबीयांशिवाय येथे राहणे कठीण असते, पण सध्याची परिस्थिती बघता संघाचे नाते मजबूत झाले आहे, असेही तो म्हणाला.अश्विनने सांगितले की, ‘ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान माझे कुटुंब माझ्यासोबत होते. आयपीएलदरम्यानही स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात ते माझ्यासोबत होते. पण, या मालिकेत मी त्यांना येथे आणलेले नाही. कारण मी रोटेशन नीती तयार केली आहे आणि त्यांना घरी सोडले आहे. त्यामुळे त्यांनाही ब्रेक मिळेल.’ बायो बबलमुळे संघाचे नाते घट्ट झाले आहे, असे सांगत अश्विन म्हणाला, ‘कुटुंबीय नसल्यामुळे संघातील खेळाडूंसोबतचे नाते अधिक घट्ट झाले आहे. बायो बबलमुळे खेळाडू जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवीत आहेत.’ फावल्या वेळेत मी ऑनलाइन वस्तू बघतो, पुस्तके वाचतो आणि योगा करतो, असे अश्विन म्हणाला.
व्यक्ती व क्रिकेटपटू म्हणून छाप सोडण्यास इच्छुक ‘मी एक व्यक्ती व क्रिकेटपटू म्हणून चांगला होण्यास इच्छुक आहे. त्यामुळे मी खूश आहे आणि खेळाचा आनंद घेत आहे. गेल्या १५ वर्षांत मी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करीत आहे. मी कामगिरीत सातत्य राखण्यास प्रयत्नशील असून कुठल्याही बाबीबाबत अधिक विचार करीत नाही.’