दुबई : सलामीचा सामना गमाविणारे द. आफ्रिका आणि वेस्ट इंडीज संघ मंगळवारी आमने-सामने येणार असून, दोन्ही संघांतील फलंदाज कशी कामगिरी करतील, यावर लक्ष राहणार आहे. द. आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाने पाच गड्यांनी नमविले. इंग्लंडने वेस्ट इंडीजचा सहा गडी राखून सहज पराभव केला होता. गुणांचे खाते उघडण्यासाठी दोन्ही संघांना फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करावीच लागेल.
विंडीज संघ ५५ धावांत गारद झाला. आफ्रिकेनेदेखील केवळ ११८ धावा उभारल्या होत्या. द. आफ्रिकेची आघाडीची फळी कोसळताच हा संघ अडचणीत येतो. एडेम मार्करमने मागच्या सामन्यात ३६ चेंडूंत ४० धावा केल्या; पण दुसऱ्या टोकाहून त्याला साथ मिळाली नव्हती.
डेव्हिड मिलरची खराब कामगिरी सुरूच राहिली, शिवाय अनुभवहीन मधल्या फळीकडूनही चमत्कार घडला नव्हता.
या संघात कॅगिसो रबाडा आणि एन्रिच नोर्खिया हे उत्कृष्ट वेगवान गोलंदाज असून, फिरकीची भिस्त तबरेज शम्सी आणि केशव महाराज यांच्यावर आहे. विंडीजचे फलंदाज इंग्लंडविरुद्ध फिरकीपुढे गोंधळले होते. त्यामुळे आफ्रिका संघ फिरकीपटींकडून अपेक्षा बाळगून आहे. वर्षाच्या सुरुवातीला आफ्रिका संघाने विंडीजवर मालिका विजय साजरा केला होता. दुसरीकडे दोन वेळचा चॅम्पियन विंडीजलादेखील चुकांपासून बोध घेण्याची गरज असेल. या संघातील सर्वच दिग्गज दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरले होते.
Web Title: A look at the performance of the batsmen in the West Indies-South Africa match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.