LA Olympics 2028 मध्ये क्रिकेटचा समावेश, किती संघ खेळणार, पाकिस्तानची संधी हुकणार?

Cricket returns in Olympics 2028: तब्बल १२८ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळाला मिळालं स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 14:33 IST2025-04-10T14:32:20+5:302025-04-10T14:33:40+5:30

whatsapp join usJoin us
Los Angeles 2028 Olympics includes Cricket to feature 6 teams 90 players return after 128 years India vs Pakistan | LA Olympics 2028 मध्ये क्रिकेटचा समावेश, किती संघ खेळणार, पाकिस्तानची संधी हुकणार?

LA Olympics 2028 मध्ये क्रिकेटचा समावेश, किती संघ खेळणार, पाकिस्तानची संधी हुकणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Cricket returns in Olympics 2028: १२८ वर्षांनंतर अखेर LA Olympics 2028 म्हणजेच २०२८ साली होणाऱ्या लॉस एंजेल्स ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होणार आहे. स्पर्धेच्या आयोजकांनी या संदर्भातील घोषणा केली. लॉस एंजेल्स ऑलिंम्पिकच्या आयोजकांनी या स्पर्धेत क्रिकेटसाठी संघही निश्चित केले आहेत. पुरुष आणि महिला दोन्ही गटात प्रत्येकी सहा संघ सहभागी होणार आहेत. हे सामने टी२० पद्धतीचे असतील. पहिल्या तीन संघांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांनी सन्मानित करण्यात येईल.

पॅरिस ऑलिम्पिक १९०० मध्ये शेवटचा क्रिकेट सामना

१९०० मध्ये पॅरिस ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा शेवटचा समावेश होता. त्यानंतर ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात दोन दिवसांचा सामना खेळवण्यात आला. आता ती एक अनधिकृत मॅच म्हणून गणली जाते. लॉस एंजेल्स ऑलिंपिकमध्ये सहा संघ टी२० स्वरूपात खेळतील. एवढेच नाही तर आयोजकांनी संघातील खेळाडूंची कमाल संख्या देखील निश्चित केली आहे. एका संघात १५ खेळाडू असतील, असे आयोजकांनी सांगितले आहे. पुरुष आणि महिला दोन्ही गटात जास्तीत जास्त ९० खेळाडूंचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.

अमेरिकेचा संघ जवळपास निश्चित, पाकिस्तानची संधी हुकणार?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सध्या १२ नियमित आणि ९४ संलग्न देश सदस्य आहेत. नियमित सदस्यांमध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे या देशांचे संघ आहेत. पण २०२८च्या ऑलिंपिकसाठी पात्रता प्रक्रिया अद्याप जाहीर झालेली नाही. अमेरिका यात सहभागी होईल हे निश्चित मानले जाते, कारण यजमानपदाचा त्यांना लाभ मिळेल. याचा अर्थ असा की अमेरिकेव्यतिरिक्त, आणखी पाच संघ सहभागी होऊ शकतील आणि त्यांची पात्रता कशी ठरवली जाते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. क्रिकेटमध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान हा सामना सर्वत्र पाहिला जातो. पण पाकिस्तान संघाचा सध्याचा फॉर्म पाहता, त्यांची या स्पर्धेत खेळण्याची संधी हुकणार का, असा सवाल चाहतेच विचारत आहेत.

पाच नव्या खेळांचा समावेश

लॉस एंजेल्स ऑलिम्पिकमध्ये ज्या पाच नवीन खेळांना स्थान देण्यात आले आहे, त्यात क्रिकेटचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने २०२८ ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटव्यतिरिक्त बेसबॉल/सॉफ्टबॉल (baseball/softball), ध्वज फुटबॉल (flag football), लॅक्रोस (lacrosse) आणि स्क्वॅश (squash) यांचा समावेश आहे.

Web Title: Los Angeles 2028 Olympics includes Cricket to feature 6 teams 90 players return after 128 years India vs Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.