T20 World Cup 2021: आयसीसी टी-२० विश्वचषकामध्ये पहिल्या दोन सामन्यात पराभूत झालेल्या भारतीय संघाने नंतरच्या दोन सामन्यात दणदणीत विजय मिळवून जोरदार पुनरागमन केले आहे. मात्र भारतीय संघाचे भवितव्य आता अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असणार आहे. या सामन्यात न्यूझीलंड जिंकल्यास भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. तर अफगाणिस्तानचा विजय झाल्यास भारतीय संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी असेल. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाजी शोएब अख्तर यानं मोठं विधान केलं आहे.
"भारताचं भविष्य आता न्यूझीलंडच्या हातात आहे. जर न्यूझीलंडचा अफगाणिस्तान विरुद्ध पराभव झाला तर खूप प्रश्न विचारले जातील. मी तुम्हाला आधीच इशारा देतोय. जर असं झालं तर वेगळीच चर्चा सुरू होईल. मला कोणतंही वादग्रस्त विधान करुन नवा वाद ओढावून घ्यायचा नाही. पण न्यूझीलंडबाबत पाकिस्तानी चाहत्यांच्या भावना सध्या खूप वेगळ्या आहेत", असं शोएब अख्तर म्हणाला.
"मला वाटतं न्यूझीलंड संघ अफगाणिस्तानपेक्षा नक्कीच उजवा आहे. पण उलटफेर झाला आणि न्यूझीलंडला पराभवाला सामोरं जावं लागलं तर खूप मोठी अडचण निर्माण होईल. सोशल मीडियाला कुणीही थांबवू शकणार नाही. न्यूझीलंडच्या पराभवाबाबत सोशल मीडियात तुफान चर्चा होईल आणि याचा विचार करायला हवा", असंही शोएब अख्तर त्याच्या यूट्यूब चॅनलवरील एका कार्यक्रमात म्हणाला आहे.
"वर्ल्डकप स्पर्धा खूप रोमांचक वळणावर येऊन पोहोचली आहे. भारतीय संघाचं उपांत्य फेरीत पोहोचणं हे तर एक चमत्कारच घडवू शकतो. न्यूझीलंडचा संघ अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात नक्कीच दबावाखाली असेल. खरंतर हा सामना त्यांच्यासाठी उपांत्य पूर्व फेरीसारखाच आहे", असं शोएब अख्तर म्हणाला.