इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दणदणीत विजयाची नोंद करताना गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली. IPL 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना एका खास कारणासाठी इतिहासात नोंदवला गेला. या सामन्यात लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील LSG संघाने १३ खेळाडू खेळवले. आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेअर या नियमामुळे प्रत्येक संघ १२ खेळाडूंना खेळवू शकतो, परंतु काल लखनौने १३ खेळाडूंसह KKR शी दोन हात केले.
कोलकाता विरुद्धच्या सामन्यात लखनौने राहुल (कर्णधार/विकेटकीपर), मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, रवी बिश्नोई, नवीन उल हक, मोहसिन खान, यश ठाकूर अशी प्लेइंग इलेव्हन मैदानावर उतरवली. इम्पॅक्ट खेळाडूंमधील युधवीर सिंग चरक आणि अर्शीन कुलकर्णी हेहीनंतर ही मॅच खेळले. यापैकी कुलकर्णी हा इम्पॅक्ट खेळाडू म्हणून फलंदाजीला उतरला आणि तो १२वा खेळाडू ठरला असता. मात्र गोलंदाजीदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे मोहसिन खानला बाहेर जावे लागले. रवी बिश्नोईच्या चेंडूवर उडालेली कॅच पकडण्याच्या प्रयत्नात मोहसिन खान जमिनीवर जोरात आदळला. यात त्याचे डोक आपटले आणि त्याला मैदान सोडावे लागले. त्याच्या जागी लखनौने युधवीरची निवड केली. अशा परिस्थितीत तो लखनौचा १२वा तर अर्शीन १३वा खेळाडू ठरला.
युधवीरने दोन षटके टाकली आणि २४ धावा दिल्या आणि एक बळी घेतला. त्याने आपल्या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर अंगक्रिश रघुवंशीची विकेट घेतली. त्याने पहिल्या षटकात सात धावा दिल्या पण पुढच्या षटकात १७ धावा दिल्या. युधवीर हा आयपीएलच्या इतिहासातील फक्त दुसरा कन्कशन खेळाडू ठरला आहे. या सामन्यापूर्वी, आयपीएल २०२३ दरम्यान, मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात १३ खेळाडू खेळवले होते. विष्णू विनोद हा इशान किशनच्या जागी कन्कशन खेळाडू म्हणून आला होता, तर नेहल वढेरा त्या सामन्यात इम्पॅक्ट खेळाडू होता.