ravi bishnoi ipl । नवी दिल्ली : भारतीय संघाचा आणि लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) युवा फिरकीपटू रवी बिश्नोईने एक मोठा खुलासा केला आहे. 2018 च्या आयपीएलदरम्यान (IPL) राजस्थान रॉयल्सचा नेट बॉलर होण्यासाठी तो बारावीच्या बोर्ड परीक्षेत बसला नव्हता. तसेच 2020 अंडर-19 विश्वचषक फायनलनंतर त्याने कोणासोबत देखील स्लेजिंग केली नसल्याचे बिश्नोईने सांगितले.
रवी बिश्नोईने लखनौच्या पॉडकास्टवर बोलताना म्हटले, "मी माझ्या 12 वीच्या बोर्ड परिक्षेला गेलो नव्हतो. कारण मी राजस्थान रॉयल्सचा नेट बॉलर होतो. माझ्या वडिलांनी मला बोलावले आणि मला परत येण्यास सांगितले पण प्रशिक्षकांनी मला सांगितले की, तुला इथेच राहावे लागेल. मग मी त्या वर्षी बोर्ड सोडण्याचा निर्णय घेतला, पण पुढच्या वर्षी मी ते केले."
भारतीय गोलंदाजाचा मोठा खुलासा "वयाच्या 10 व्या वर्षी मी क्रिकेट अकॅडमीत प्रवेश घेतला आणि जेव्हा मी 15 वर्षांचा झालो तेव्हा मी माझे शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला. मला क्रिकेटमधून वेळ मिळत नव्हता. ही बाब पालकांना पटवून देणे हे खूप कठीण होते. तेव्हा माझ्या प्रशिक्षकांनी माझ्या वडिलांना सांगितले की, त्याच्या कौशल्यामुळे त्याला क्रिकेट खेळू द्या", असे रवी बिश्नोईने आणखी सांगितले. खरं तर बांगलादेशने भारताचा 3 गडी राखून पराभव करून 2020 अंडर-19 विश्वचषक जिंकला होता. बिश्नोई हा त्या विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. सामन्यानंतर दोन्ही संघांमध्ये वादही झाला. अखेर बिष्णोईने तेव्हाच्या वादावर स्पष्टीकरण दिले आहे.
बांगलादेशच्या खेळाडूंसोबतच्या वादावर सोडले मौन बांगलादेशच्या खेळाडूंसोबतच्या वादावर बिश्नोईने म्हटले, "अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये बांगलादेशी खेळाडू आमच्या फलंदाजांसोबत स्लेजिंग करत होते. म्हणून आम्ही त्यांना प्रत्युत्तर दिले. विजयानंतर त्यांनी मर्यादा ओलांडली. त्यांनी आमची खिल्ली उडवायला सुरुवात केली आणि त्या क्षणी मी काही गोष्टी बोलल्या, ज्या मला बोलायला नको होत्या. त्या फायनलनंतर कधीही कोणाची स्लेजिंग केली नाही."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"