चौकार-षट्कारांचा पाऊस पाडत एकतर्फी ठरविलेल्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने दणदणीत विजय मिळवताना पंजाब किंग्जचा ५६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर लखनौने आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वोत्तम धावसंख्या उभारताना २० षटकांत ५ बाद २५७ धावा केल्या. यानंतर त्यांनी पंजाबला १९.५ षटकांत २०१ धावांत गुंडाळले.
भल्यामोठ्या आव्हानाचे ओझे पंजाबला पेलवलेच नाही. कर्णधार शिखर धवन आणि धडाकेबाज प्रभसिमरन सिंग हे पहिल्या चार षटकांमध्येच बाद झाले. यानंतर सिकंदर रझा आणि अथर्व तायडे यांनी ४७ चेंडूंत ७८ धावांची भागीदारी केली. मात्र, त्यांचे प्रयत्नही अपुरे पडले. यानंतर लखनौने ठरावीक अंतराने बळी घेत पंजाबचे मानसिक खच्चीकरण केले. अथर्वने एकाकी झुंज देताना २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. भली मोठी धावसंख्या रचलेल्या लखनौने तब्बल ९ गोलंदाजांचा वापर करत अनोखा प्रयोग केला.
लखनौ आणि पंजबाच्या या सामन्यानंतर गुणातालिकेत लखनौने मोठी झेप घेतली आहे. गुणतालिकेत आता ४ संघ १० गुणांवर आहे. पहिल्या स्थानावर राजस्थान असून दुसऱ्या स्थानावर लखनौ आहे. गुजरात तिसऱ्या क्रमांकावर , तर चेन्नई १० गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. बंगळुरु ८ गुणांसह पाचव्या, पंजाब सहाव्या, कोलकाता सातव्या स्थानावर आहे. तर मुंबई ६ गुणांसह आठव्या, हैदराबाद नवव्या आणि दिल्ली दहाव्या क्रमांकावर आहे.
दिल्ली विरुद्ध हैदराबाद लढत
आयपीएलच्या यंदाच्या सोळाव्या हंगामात दोन्ही संघांची परिस्थिती समान आहे. आतापर्यंत झालेल्या सात सामन्यांपैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी फक्त दोन सामने जिंकले आहेत. सनरायझर्स हैदराबाद चांगल्या नेट रन रेटमुळे नवव्या स्थानावर तर दिल्ली कॅपिटल्स दहाव्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सने सलग मागील दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर हैदराबादने सलगन तीन सामने गमावले आहेत.
गुजरात आणि कोलकाता आमने-सामने
आज कोलकातामधील ईडन गार्डन्स मैदानावर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात आणि नितीश राणाच्या नेतृत्वात कोलकाता हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. आयपीएल गुणतालिकेत गुजरात दुसऱ्या क्रमांकावर तर कोलकाता सातव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघ आजच्या सामन्यात विजय मिळवून पॉईंट्स टेबलमध्ये उडी घेण्याचा प्रयत्न करतील.