morne morkel ipl । नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज मॉर्नी मॉर्कल इंडियन प्रीमिअर लीग 2023 नंतर पाकिस्तानला जाणार आहे. पाकिस्तानी संघाच्या गोलंदाजीच्या प्रशिक्षकपदी मॉर्कलची नियुक्ती केली जाणार आहे. याशिवाय त्याच्याच देशाचा माजी खेळाडू ॲंड्र्यू पुटीकला फलंदाजीचा प्रशिक्षक केले जाण्याची शक्यता आहे. अलीकडेच पाकिस्तानी संघाला अफगाणिस्तानविरूद्ध ट्वेंटी-20 मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले होते.
पाकिस्तानच्या गोलंदाजांना करणार मार्गदर्शन खरं तर मॉर्नी मॉर्कल सध्या लखनौ सुपर जायंट्सच्या संघासोबत गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. मॉर्कलकडे प्रशिक्षकपदाचा फारसा अनुभव नसला तरी त्याची क्रिकेट कारकिर्द शानदार राहिली आहे. त्यामुळे आयपीएलच्या 16व्या हंगामानंतर मोर्कल पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे मॉर्कलने ट्वेंटी-20 विश्वचषकात नामिबियाच्या गोलंदाजांना मार्गदर्शन केले होते. याशिवाय दक्षिण आफ्रिकेत झालेल्या महिला ट्वेंटी-20 विश्वचषकात मॉर्कलने न्यूझीलंडच्या महिला खेळाडूंना प्रशिक्षण दिले होते.
दरम्यान, मॉर्नी मॉर्कलने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केले होते. त्याने 2006 मध्ये भारताविरूद्ध डरबन कसोटी सामन्यातून कसोटीमध्ये पदार्पण केले होते. त्याने दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना 86 कसोटी, 117 वन डे आणि 44 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये आफ्रिकेला विजय मिळवून दिला आहे.
आगामी IPL हंगामासाठी लखनौचा संघ -लोकेश राहुल (कर्णधार), आवेश खान, आयुष बदौनी, क्विंटन डी कॉक, के गौतम, दीपक हुडा, काइल मेयर्स, अमित मिश्रा, निकोलस पूरन, नवीन-उल-हक, क्रुणाल पांड्या, रवी बिश्नोई, प्रेरक मांकड, डॅनियल सॅम्स, करण शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, मार्कस स्टॉयनिस, स्वप्निल सिंग, जयदेव उनाडकट, मनन वोहरा, मार्क वुड, यश ठाकूर.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"