पुणे : लखनौ सुपर जायंट्सने शनिवारी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा तब्बल ७५ धावांनी सहज पराभव करीत अव्वल स्थानावर झेप घेतली. सलामीवीर क्विंटन डिकॉकचे अर्धशतक आणि दीपक हुड्डाच्या ४१ धावांच्या खेळीपाठोपाठ तळाच्या फलंदाजांनी दिलेल्या उपयुक्त योगदानामुळे लखनौने गहुंजे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध २० षटकात ७ बाद १७६ धावा उभारल्या. केकेआरला त्यांनी १४.३ षटकात १०१ धावात गारद केले.
केकेआरकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक ४५ धावा केल्या. लखनौकडून आवेश खान आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. सुनील नारायण २२, ॲरोन फिंच १४, श्रेयस अय्यर ६ आणि नीतीश राणा केवळ दोन हे पाठोपाठ बाद झाले. त्याआधी डिकॉकने २९ चेंडूत तीन षटकार आणि चार चौकारांसह ५० धावांची खेळी केली. सुनील नारायणने शिवम मावीकरवी त्याला झेलबाद केले. कर्णधार लोकेश राहुल मात्र पहिल्याच षटकात भोपळा न फोडताच माघारी परतला. डिकॉक- राहुल यांच्यात धाव घेण्यासाठी हो- नाही, हो-नाही असे नाट्य रंगले. डिकॉक आधी धाव घेण्यास बाहेर निघाला, मात्र लगेच दोघेही आपापल्या टोकावर परतले. दरम्यान श्रेयस अय्यरने शानदार थेट फेकीवर राहुलला धावबाद केले.
दीपक हुड्डाने २७ चेंडूत ४१ धावांचे योगदान दिले. रसेलच्या चेंडूवर बाद होण्याआधी दीपकने डिकॉकसोबत ३९ चेंडूत ७१ धावांची भागीदारी केली. कृणाल पांड्या हादेखील २७ चेंडूत २५ धावा काढल्यानंतर रसेलचाच बळी ठरला. स्टोयनिसने १४ चेंडूत २८ तर जेसन होल्डरने १३ धावा केल्या. केकेआरकडून आंद्रे रसेलने २२ धावात दोन तसेच टिम साऊदी, शिवम मावी आणि सुनील नारायणने एकेक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक लखनौ सुपर जायंट्स : २० षटकांत ७ बाद १७६ (क्विंटन डिकॉक ५०, दीपक हुडा ४१, मार्कस स्टोयनिस २८, कृणाल पांड्या २५.) गोलंदाजी : आंद्रे रसेल २/२२, सुनील नारायण १/२०, टीम साऊदी १/२८, शिवम मावी १/५०. कोलकाता नाईट रायडर्स : २० षटकांत सर्वबाद १०१ (आंद्रे रसेल ४५, सुनील नारायण २२, ॲरोन फिंच १४). गोलंदाजी : आवेश खान ३/१९, जेसन होल्डर ३/३१, मोहसीन खान १/६, दुश्मंत चमीरा १/१४, रवी बिष्णोई १/३०.