दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या वन डे सामन्यात भारताविरूद्ध २८७ धावा केल्या. क्विंटन डी कॉकची १२४ धावांची खेळी आणि त्याला वॅन डर डुसेनच्या ५२ धावांच्या खेळीची मिळालेली साथ याच्या बळावर यजमानांनी ही धावसंख्या उभारली. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला भारताचा कर्णधार केएल राहुल स्वस्तात बाद झाला. पण शिखर धवनने विराटच्या साथीने डाव पुढे नेला. हे दोघे मैदानात असताना धवनसाठी एक चांगली गोष्ट घडली.
नक्की काय घडलं?
१३व्या षटकात मंगाला गोलंदाजी करत होता. त्यावेळी त्याने टाकलेल्या एका चेंडूवर धवनने चौकार लगावला. तो चेंडू नो बॉल देण्यात आला. त्यामुळे पुढचा चेंडू फ्री हिट झाला. फ्री हिटच्या चेंडूवर धवन मोठा फटका खेळणार हे नक्की होतं. त्यामुळे गोलंदाजाने चेंडू बाऊन्सर टाकला. त्यावर फटका मारताना बॅटला लागून चेंडू थेट स्टंपवर लागला आणि तो क्लीन बोल्ड झाला. पण नशिबाने तो चेंडू फ्री हिट असल्याने शिखर धवन नाबाद राहिला आणि त्याने एक धाव घेतली.
दरम्यान, त्याआधी दक्षिण आफ्रिकेने ५० षटकात २८७ धावा केल्या. दीपक चहरने सलामीवीर यानामन मलानला स्वस्तात माघारी धाडलं. केएल राहुलनेही बावुमाला पटकन धावचीत केलं. तर पाठोपाठ मार्करमही १५ धावांवर बाद झाला. पण डी कॉक आणि डुसेन जोडीने १४४ धावांची भागीदारी केली. दोघांनी फटकेबाजी करत संघाला चांगली धावसंख्या गाठून दिली. हे दोघे बाद झाल्यानंतर तळाच्या फलंदाजांनी छोट्या मोठ्या भागीदारी करून संघाला २८७ धावांपर्यंत मजल मारून दिली.