बर्मिंगहॅम, अॅशेस 2019 : ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनने अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीचा अखेरचा दिवस गाजवला. त्यानं इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले. 398 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडच्या 6 फलंदाजांना लियॉनने माघारी पाठवले. या कामगिरीसह त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 350 विकेट्सचा पल्लाही ओलांडला. ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे आणि दुसरा सामना 14 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
या सामन्यात स्टीव्ह स्मिथनं दोन्ही डावांत शतकी खेळी करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. लियॉनला पहिल्या डावात साजेशी कामगिरी करता आली नव्हती. पण, त्याची भरपाई त्यानं दुसऱ्या डावात केली. त्यानं 49 धावांत इंग्लंडच्या सहा फलंदाजांना तंबूत पाठवले. इंग्लंडचा दुसरा डाव 146 धावांत गडगडला. त्यानं जो रुट, जो डेन्ली, बेन स्टोक्स, मोईन अली आणि जेसन रॉय या प्रमुख फलंदाजांना बाद केले. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं एडबॅस्टनवर 2001नंतर प्रथमच विजय मिळवला.
या कामगिरीनंतर लियॉनचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पण, बिग बॅश लीगमधील सिडनी सिक्सर संघाने केलेलं कौतुक जर हटके ठरत आहे. सिक्सरने त्यांच्या अधिकृत ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणइ त्यात लायन किंग्स या डिस्नीच्या चित्रपटातील सिम्बाच्या भूमिकेत लियॉनला दाखवले आहे.
पाहा व्हिडीओ...
ऑस्ट्रेलियाचा जिगरबाज विजय, स्टीव्हन स्मिथ ठरला शिल्पकारअॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यावर ऑस्ट्रेलियाने मोहोर उमटवली. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो स्टीव्हन स्मिथ. कारण या सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला नॅथन लिऑनने सहा विकेट्स घेत खिंडार पाडले आणि ऑस्ट्रेलियाने 251 धावांनी हा सामना जिंकला. दोन्ही डावांत मिळून 286 धावा करणाऱ्या स्मिथला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
या कामगिरीच्या जोरावर त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली. या सामन्यापूर्वी स्मिथच्या खात्यात 857 गुण जमा होते, परंतु सामन्यानंतर त्याची गुणसंख्या ही 903 झाली आहे. या कामगिरीसह त्यानं कसोटी फलंदाजांमध्ये तिसऱ्या स्थानी झेप घेतली. केन विलियम्सन ( 913) आणि विराट कोहली ( 922) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. चेतेश्वर पुजाराची ( 881) चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.
Web Title: The Lyon King: Sydney Sixers pay unique tribute to Australian spinner Nathan Lyon after Edgbaston heroics
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.