Join us  

स्वत:च्याच नावाचं 'मैदान' गाजवलं, पहिल्याच सामन्यात शतक; अभिमन्यूचा नवा विक्रम

अभिमन्यूचे वडिल रंगनाथन परमेश्वरन ईश्वरन व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. पण, ते मोठे क्रिकेटप्रेमीही आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 3:52 PM

Open in App

पश्चिम बंगालचा रणजी क्रिकेट संघ आज डेहरादून येथील 'अभिमन्यू क्रिकेट अकॅडमी स्टेडियम'मध्ये उत्तराखंडविरुद्ध मैदानात उतरला आहे. या सामन्यातून भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेला सलामीचा फलंदाज अभिमन्यू ईश्वरन हाही खेळताना दिसला. विशेष म्हणजे अभिमन्यूने पहिल्याच दिवशी शतकी खेळी केली असून नवा विक्रमच रचला आहे. स्वत:च्याच नावाने उभारलेल्या स्टेडियममध्ये अभिमन्यूने आपले शतक झळकावले. त्यामुळे, हा त्याच्या कुटुंबीयांसाठी दुग्धशर्करा योग आहे.  

अभिमन्यूचे वडिल रंगनाथन परमेश्वरन ईश्वरन व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. पण, ते मोठे क्रिकेटप्रेमीही आहेत. यांच्या याच क्रिकेटप्रेमाचेच हे फळ आहे. रंगनाथन यांनी २००५ मध्ये डेहरादून येथे मोठी जमीन खरेदी केली होती. त्यानंतर, या जमिनीवर क्रिकेट स्टेडियम बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसेही खर्च केले होते. आज त्याच मैदानावर त्यांचा मुलगा क्रिकेटर बनून फलंदाजीसाठी उतरला आणि पहिल्याच सामन्यात त्याने शतकी खेळी केली. प. बंगालविरुद्ध उत्तराखंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे, प. बंगालकडून सलामीचा फलंदाज म्हणून अभिमन्यू मैदानात उतरला. पहिल्याच दिवशी ५९ षटकांच्या ब्रेकपर्यंत प. बंगालने २११ धावा केल्या आहेत. त्यामध्ये, ईश्वरनने १५८ चेंडूत १११ धावा केल्या असून तो नाबाद आहे. या खेळीत त्याने १० चौके आणि १ षटकार ठोकला.  

दरम्यान, आज सामना खेळण्यापूर्वी ईश्वरनने सामन्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी तो म्हणाला की, माझ्यासाठी येथील मैदानावर रणजी सामना खेळणे हा अभिमानाचा क्षण आहे. याच मैदानावरुन मी युवा क्रिकेटर्स बनून क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. हे मैदान अभिमन्यू ईश्वरन यांच्या वडिलांच्याच मेहनतीचे आणि क्रिकेटप्रेमाचे फळ आहे. घरी येऊन कधीही चांगलंच वाटतं, पण जेव्हा मैदानावर असतो तेव्हा बंगाल संघासाठी मॅच जिंकणं हेच एकमेव लक्ष्य असतं, असेही तो म्हणाला होता.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघपश्चिम बंगालरणजी करंडकउत्तराखंड
Open in App