Madhya Pradesh won the Ranji Trophy title : २३ वर्षांपूर्वी कर्णधार म्हणून मला याच मैदानावर जेतेपद पटकावण्यात अपयश आलं होतं अन् आज कर्णधार म्हणून मी रणजी करंडक नावावर केला, हे वाक्य आहे भारताचे माजी क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित यांचे... मध्य प्रदेशनेरणजी करंडक २०२२ च्या अंतिम सामन्यात मुंबईवर विजय मिळवून प्रथमच जेतेपद पटकावण्याचा मान मिळवला. मध्य प्रदेशने ६ विकेट्स राखून मुंबईने विजयासाठी ठेवलेले १०८ धावांचे लक्ष्य पाचव्या दिवशी पार केले. २३ वर्षांपूर्वी याच चिन्नास्वामी स्टेडियमवर चंद्रकांत पंडित यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशचा संघ कर्नाटकविरुद्ध फायनलमध्ये हरला होता. तेव्हा अश्रूनयनांनी पंडित व सहकाऱ्यांनी मैदान सोडले होते. पण, आज पंडित हे मध्य प्रदेशचे मुख्य प्रशिक्षक आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने पहिले वहिले रणजी जेतेपद नावावर केले.
मुख्य प्रशिक्षक म्हणून चंद्रकांत पंडित यांची कामगिरी
- २००३ साली मुंबईसह जेतेपद
- २००४ साली मुंबईसह जेतेपद
- २०१६ साली मुंबईसह जेतेपद
- २०१८ व २०१९ साली विदर्भसह जेतेपद
- २०२२ साली मध्य प्रदेशसह जेतेपद
मुंबईच्या पहिल्या डावातील ३७४ धावांच्या प्रत्युत्तरात मध्य प्रदेशने ५३६ धावांचा डोंगर उभा केला. यश दुबे ( १३३) , शुभम शर्मा ( ११६), रजत पाटिदार ( १२२) व सारांश जैन ( ५७) यांच्या खेळीच्या जोरावर मध्य प्रदेशने आघाडी घेतली. मुंबईने दुसऱ्या डावात २६९ धावाच केल्या. सुवेध पारकर ( ५१), पृथ्वी शॉ ( ४४) व सर्फराज खान ( ४५) यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मध्य प्रदेशच्या कुमार कार्तिकेयने ४, गौरव यादव व पार्थ सहानी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. १०८ धावांचे लक्ष्य मध्य प्रदेशने ४ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. हिमांशू मंत्री ( ३७), शुभम शर्मा ( ३०) व रजत पाटिदार ( ३०*) यांनी हा विजय मिळवून दिला.