भारताचा स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग याच्यानंतर कसोटीत त्रिशतक झळकवणारा भारताचा खेळाडू आठवतोय का? तो आता टी-२० मधील धमाकेदार खेळीमुळे चर्चेत आला आहे. आजही टीम इंडियाच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडणारा हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे करुण नायर.
४८ चेंडूत १२४ धावांची धमाकेदार खेळी
२०१६ मध्ये इंग्लंड विरुद्ध त्रिशतकी खेळी करणाऱ्या करुण नायर याने महाराजा ट्रॉफी टी-२० स्पर्धेतील धमाकेदार खेळीनं लक्षवेधून घेतलं आहे. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात म्हैसूर वॉरियर्स संघाचे नेतृत्व करताना त्याने फक्त ४८ चेंडूत १२४ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याचा हा अंदाज पाहून अनेकांना चेन्नईच्या मैदानातील इंग्लंड विरुद्धच्या कसोटीतील त्याची नाबाद ३०३ धावांची खेळीही आठवली असेल.
मेगा लिलावात मोठी कमाई करण्याची मिळू शकते संधी
करुण नायर याने टी-२० तील आपल्या शतकी खेळीत १३ चौकार आणि ९ षटकार मारले. त्याने या सामन्यात २५८.३३ च्या स्ट्राइक रेटनं धावा काढल्या. ड्रॅगन्स विरुद्धची त्याची धडाकेबाज खेळी हा खेळाडू पुन्हा एकदा टीम इंडियाचे दरवाजे ठोठावण्यासाठी तयार असल्याचे संकेत देणारा आहे. याशिवाय अनसोल्ड खेळाडूचा शिक्का पुसून काढत मेगा लिलावात मोठी कमाई करण्याची एक संधीही त्याला मिळू शकते.
आयपीएलमध्ये राहिला होता अनसोल्ड
करुण नायर हा आयपीएलमध्येही खेळताना दिसला आहे. ७६ सामन्यातील ६८ डावात त्याच्या खात्यात १४९६ धावा जमा आहेत. यात १० अर्धशतकांचा समावेश आहे. २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून कोलकताना नाईट रायडर्स विरुद्ध अखेरचा IPL सामना खेळला होता. २०२४ साठी झालेल्या लिलावात ५० लाख रुपये मूळ किंमत असूनही त्याला कुणी भाव दिला नव्हता. महाराजा टी-२० स्पर्धेतील त्याची कामगिरी मेगा लिलावाच्या दृष्टीने त्याच्यासाठी नक्कीच फायद्याची ठरू शकते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून आयपीएल पदार्पण करणाऱ्या करूण नायर याने आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्स (सध्याचे दिल्ली कॅपिटल्स), किंग्ज इलेव्हन पंजाब (सध्या पंजाब किंग्स), कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.