बेळगांव : महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडनं कारकिर्दीतील सर्वोत्तम नाबाद 187 (136 चेंडू) धावांच्या खेळीच्या जोरावर भारत A संघाने 48 धावांनी श्रीलंका A संघावर विजय मिळवला. 42 षटकांच्या या लढतीत ऋतुराजच्या फटकेबाजीनं भारतीय संघाला 4 बाद 317 धावांचा पल्ला गाठून दिला. प्रत्युत्तरात श्रीलंका संघाने 6 बाद 269 धावा केल्या. सेहान जयसूर्यानं चौथ्या क्रमांकावर येताना 120 चेंडूंत नाबाद 108 धावा केल्या.
ऋतुराजनं दमदार खेळी करताना 46 चेंडूंत अर्धशतक झळकावलं आणि 94 चेंडूत शतक पूर्ण केले. त्याच्या धावांतील अखेरच्या 82 धावा या अवघ्या 42 चेंडूंत आल्या. त्याने अनमोलप्रीत सिंग आणि इशान किशन यांच्यासह दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकासाठी मजबूत भागीदारी केली. अनमोलप्रीतने 65 चेंडूंत 67 धावा केल्या आणि 163 धावांची भागीदारी केली. तर किशनने 34 चेंडूंत 45 धावा करताना ऋतुराजसह 99 धावा जोडल्या. ऋतुराजनं आपल्या खेळीत 26 चौकार व दोन षटकार खेचले.
ऋतुराजची ही खेळी लिस्ट A क्रिकेटमधील भारतीय फलंदाजाने केलेली दुसरी सर्वोत्तम खेळी नोंदवली. भारताच्या शिखर धवनने 2013 साली दक्षिण आफ्रिका A विरुद्ध 248 धावा चोपल्या होत्या. लिस्ट A क्रिकेटमध्ये 45 षटकांपेक्षा कमी षटकांमधली ही दुसरी सर्वोत्तम खेळी ठरली. एलिस्टर ब्राउनने 1997साली 40 षटकांच्या लढतीत 203 धावा केल्या होत्या. ऋतुराजचे लिस्ट A क्रिकेटमधील चौथे शतक आहे. त्याने 52.16च्या सरासरीनं 1565 धावा केल्या आहेत. 2019च्या इंडियन प्रीमिअर लीगच्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने त्याला करारबद्ध केले.
भारत A - 4 बाद 317 ( गायकवाड 187*, अनमोलप्रीत 65, किशन 45; लाहिरू कुमारा 3-62) वि. वि. श्रीलंका A - 6 बाद 269 ( जयसूर्या 108*, शनाका 44)
Web Title: Maharashtra batsman Ruturaj Gaikwad smashes 187* to lead India A to victory over Sri Lanka A team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.