महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नवीन लोगोचे अनावरण करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा या लोगोमध्ये पाहायला मिळत आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी अनावरण सोहळा पार पडला. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या नव्या लोगोचे अनावरण आयसीसी व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार, बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार व ॲपेक्स बॅाडी सदस्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी क्रिकेटर चंदू बोर्डे, भारतीय संघाचा खेळाडू ऋतुराज गायकवाड, महाराष्ट्राचे आजी-माजी क्रिकेटपटू तसेच एमसीएचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
MCA च्या नवीन लोगोचे अनावरण
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांनी या कार्यक्रमाची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी पोस्टच्या माध्यमातून म्हटले की, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्यात सुरु करण्यात आलेल्या नवीन ऑफिसचे उद्घाटन आणि MCA च्या नवीन लोगोचे अनावरण ज्येष्ठ नेते आणि ICC चे माजी अध्यक्ष पवार साहेब आणि BCCI चे खजिनदार आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ॲपेक्स बॉडी सदस्य, माजी क्रिकेटर चंदू बोर्डे सर, ऋतुराज गायकवाडसह आजी-माजी खेळाडूंची उपस्थिती होती.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा नवीन लोगो
आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मोदीबाग पुणे येथील कार्यालय उद्घाटन आणि बोधचिन्हाच्या अनावरण सोहळ्याला बीसीसीआय आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार आणि बीसीसीआयचा खजिनदार म्हणून मी उपस्थितीत राहिलो. यावेळी ॲपेक्स कमिटीच्या सदस्य, खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रिकेटप्रेमींना शुभेच्छा दिल्या.