आप्पासाहेब पाटील, सोलापूर: सोलापूर शहरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू झालेल्या महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर रणजी सामन्यात पहिल्या दिवसाअखेर महाराष्ट्र संघाने मणिपूर संघावर चांगली पकड निर्माण केली. दरम्यान, मणिपूर च्या पहिल्या डावातील १३७ धावासमोर महाराष्ट्र ३/१२३ धावावर खेळत आहे. रणजी पदार्पणात हितेश वाळुंजचे ५ बळी तर प्रदीप दाढेने ४ बळी घेतले. दोघांच्या चांगल्या कामगिरीमुळे मणिपूर संघ पहिल्या दिवशी १३७ धावांवर तंबूत परतला.
दरम्यान, मणिपूर संघाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. मणिपूर संघ जेवणाचा वेळेपर्यंत ९० धावामध्ये ५ बळी बाद असा झाला. जेवणानंतर महाराष्ट्र संघाच्या भेदक गोंलदाजी पुढे मणिपूर संघ ३७ धावांवर गारद झाला. महाराष्ट्र संघाकडून हितेश वाळुंज याने पदार्पणात ३३ धावा देत पाच बळी घेतले व त्याला प्रदीप दाढे याने ३५ धावा देत ४ बळी घेत उत्कृष्ट साथ दिली.
महाराष्ट्र संघाकडून सिद्धेश वीर व ओंकार खाटपे यांनी डावाची सुरुवात केली .परंतु ओंकार खाटपे (१० धावा) स्वतास्त माघारी परतला. त्यानंतर आलेला नौशाद शेख (५) ही लवकर बाद झाला. त्यानंतर महाराष्ट्र संघाचा कर्णधार केदार जाधव याने सिद्धेश वीर सोबत ९४ धावांची भागीदारी करत डाव सावरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा सिद्धेश वीर ५८ धावा करून बाद झाला. केदार जाधव ४९ धावांवर नाबाद आहे. मणिपूर संघाकडून बिष्वोरजीत याने ४१ धावा देत २ बळी टिपले व किशन संघा याने ३८ धावा देत एक बळी घेतला.