maharashtra vs services live score | पुणे : रणजी करंडक स्पर्धेत महाराष्ट्र आणि सर्व्हिसेस यांच्यात लढत होत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सर्व्हिसेसचा संघ ११०.३ षटकांत सर्वबाद अवघ्या २९३ धावा करू शकला. प्रतिस्पर्धी संघाला ३०० च्या आत रोखण्यात महाराष्ट्राला यश आले. मात्र, याचा फायदा घेण्यात महाराष्ट्राच्या शिलेदारांना अपयश आले. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात ही लढत होत आहे.
सर्व्हिसेसच्या संघाला अपेक्षित कामगिरी करता न आल्याने महाराष्ट्राचा संघ याचा फायदा घेऊन आघाडी घेईल असे वाटत होते. मात्र, त्यांनादेखील साजेशी कामगिरी करता आली नाही. कर्णधार अकिंत बावने (७३) वगळता एकाही शिलेदाराला मोठी खेळी करता आली नाही. सर्व्हिसेसकडून अमित शुक्लाने विकेटांचा षटकार लगावून ५५ षटकांपर्यंत महाराष्ट्राला ७ बाद १७४ धावांपर्यंत ठेवले.
विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राचा कर्णधार अंकित बावने एका वादग्रस्त निर्णयावर बाद झाला. त्याला बाद घोषित केल्याने टीम इंडियाचा मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाडने संताप व्यक्त केला. खरे तर झाले असे की, अमित शुक्लाने टाकलेला चेंडू अंकितच्या बॅटला स्पर्श करून तिसऱ्या स्लीपला उभा असलेल्या शुभम रोहिल्लाच्या हातात गेला. मात्र, चेंडू एक टप्पा पडून त्याच्यापर्यंत पोहोचला होता. असे असतानादेखील सर्व्हिसेसच्या खेळाडूंनी अपील केली आणि पंचांनीही त्यांच्याच बाजूने निर्णय दिला. हे दृश्य पाहताच ऋतुराजने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत संतप्त प्रतिक्रिया दिली.
ऋतुराजने संबंधित घटनेचा व्हिडीओ शेअर करत म्हटले की, लाईव्ह सामन्यात अशा पद्धतीने कसे काय बाद घोषित केले गेले? असा झेल घेऊनही अपील करणाऱ्या लोकांची लाज वाटते. खरोखर निर्लज्जपणाचा कळस.