नागोठणे : झारखंडने शेवटच्या सात षट्कांत ४८ धावांचे महाराष्ट्रापुढे ठेवलेले लक्ष्य महाराष्ट्राच्या संघाने दोन गडी गमावून सात चेंडू बाकी ठेवत पूर्ण करून या मोसमातील पहिला विजय साकार केला. विजयामुळे महाराष्ट्राला सहा गुण मिळविले. महाराष्ट्र संघांच्या अझीम काझीने पहिल्या डावात केलेले शतक आणि दोन बळी मिळविल्याने त्याची सामनावीर म्हणून घोषणा करण्यात आली.
मंगळवारी शेवटच्या दिवशी नाझीम आणि उत्कर्ष सिंग यांनी सकाळी एक बाद ४७ वरून खेळ पुढे चालू केला. त्या वेळी डावाच्या पराभवापासून वाचण्यासाठी झारखंड २२७ धावांनी पिछाडीवर होता. फलकावर ५९ धावा झाल्या असताना मोहम्मद नाझीम ३१ धावा काढून झेलबाद झाला, तर तिसरी विकेट ७४ धावांवर उत्कर्ष सिंग याची पडली. ११५ धावा झाल्या असताना विराट सिंग २७ धावा काढून पायचित झाला. मात्र, कर्णधार सौरभ तिवारी आणि कुमार सुरज यांची जोडी जमल्याने महाराष्ट्र विजयापासून दूर जात असल्याचे दिसत असताना २५४ धावांवर तिवारी झेलबाद झाला. त्याने वैयक्तिक ८७ धावा केल्या. उर्वरित सहा फलंदाजांनी ५७ धावांची भर टाकली. कुमारने वैयक्तिक ९२ धावा केल्या. पहिल्या डावात पाच बळी घेणाऱ्या सत्यजित बच्छावने दुसºया डावातसुद्धा चार बळी घेतले. झारखंडचा डाव ३११ धावांवर संपुष्टात येऊन त्यांनी सात षट्कांत ४८ धावा काढून निर्णायक विजय मिळविण्याचे महाराष्ट्रपुढे आव्हान ठेवले होते.
महाराष्ट्र संघाच्या १० धावा झाल्या असताना स्वप्निल गुगले तीन धावा काढून बाद झाला. अझीम काझीच्या जोडीला आलेल्या नौशाद शेखने फटकेबाजीला सुरुवात केल्याने विजय जवळ आला आहे, असे वाटत असताना काझीने नऊ धावांवर आपला बळी दिल्याने महाराष्ट्राची दोन बाद २७ अशी अवस्था झाली होती. मात्र, नौशादच्या जोडीला आलेल्या कर्णधार अंकित बावणे याने साथ देत ५.५ षटकांत ४८ धावा काढून संघाचा विजय साकारला. नौशादने दोन, तर बावणेने एक षट्कार मारला. विजयानंतर कर्णधार बावणेने रिलायन्सचे मैदान सर्वोच्च असे असल्याची भावना व्यक्त केली.
मोसमातील पहिला विजय साकारणाºया महाराष्ट्राला सहा गुण मिळाले आहेत. विजयानंतर कर्णधार अंकित बावणेने रिलायन्सचे मैदान सर्वोच्च असे असल्याची भावना व्यक्त केली. पहिला विजय आम्हाला नागोठण्यात मिळाला असून तो अविस्मरणीय असाच आहे, असे अंकित बावणे याने सांगितले.
Web Title: Maharashtra wins Jharkhand by eight wickets; Azim Kazi Matchmaker
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.