आप्पासाहेब पाटील, सोलापूर : साेलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियम (पार्क) वर सुरू असलेल्या १९ वर्षाखालील कुचबिहार ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने सिक्कीम संघाचा पराभव केला. रविवारी दुसऱ्याच दिवशी सकाळच्या सत्रात पहिल्या तासाभरातच सामना संपला. या सामन्यात महाराष्ट्राने एक डाव आणि १३५ धावांनी विजय मिळवत बोनससह ७ गुणांची कमाई केली आणि अंकतालिकेत २६ गुणासह सर्वोच्च स्थान पटकाविले.
कालपासून येथे सुरू असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने आयोजित १९ वर्षाखालील मुलांच्या कुच बेहार क्रिकेट स्पर्धेतील ब गटातील महाराष्ट्राचा शेवटचा साखळी कालच्या ४ बाद ४७ वरून रविवारी सकाळी सिक्कीम संघाने दुसरा डाव सुरू केला, फलकावर ६० धावा असताना प्रथमेश गावडे ने ५ वा बळी घेत झटका दिला, पुढच्याच षटकात यश बोरकर ने सलग दोन बळी घेत सिक्कीमला पुन्हा एकदा बॅकफूट वर ढकलले. त्यानंतर महाराष्ट्राने प्रतीक तिवारी हा ४ था गोलंदाज वापरला आणि त्याने त्याच्या दुसऱ्या निर्धाव षटकात ३ बळी घेत सिक्कीम संघाचा डाव ९० धावावर संपविला.
दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग विकेट घेणाऱ्या प्रतिक तिवारीची हॅटट्रिक थोडक्यात हुकली पण षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आणखी एक विकेट घेत महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. स्पर्धेतील सगळे सामने हरल्यामुळे सिक्कीम संघाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. सिक्कीम संघाने मागच्या सामन्यात सौराष्ट्र विरुद्ध ५४, १०९ धावा; पाँडिचेरी विरुद्ध ३००, १५० धावा; आसाम विरुद्ध ७४, ३२ धावा; हैदराबाद विरुद्ध ७२, ११४ धावा केल्या होत्या.
महाराष्ट्राची गोलंदाजी:
यश बोरकर १२ - ३९/२, प्रथमेश गावडे १५ - ३८/५, प्रतिक तिवारी २ - २/३, ए निषाद ५ - ११/0
सिक्कीम चा दुसरा डाव : ९०/१० (३४ षटके)
अर्णव गुप्ता २५ (३२), रोशन प्रसाद २१(४१), पूर्णा भट्ट १९ (४९), कुणाल गुप्ता १० (३०)
यश बोरकरचे ९ तर प्रथमेश गावडेने घेतले ६ बळी
सोलापूरचे सांख्यिकी मिलिंद गोरे यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे यश बोरकरने आज २ बळी घेत सामन्यात एकूण ९ बळी घेतले तर प्रथमेश गावडे ने एकूण ६ बळी घेतले. स्पर्धेत महाराष्ट्र संघाने मागच्या सामन्यात आसाम विरुद्ध १८५ धावांनी, हैदराबाद विरुद्ध एक डाव १२ धावांनी विजय मिळवला होता तर पाँडिचेरी व सौराष्ट्र विरुद्ध पहिल्या डावात आघाडी घेतली होती.