मुंबई : महाराष्ट्राची कन्या स्मृती मानधनाला सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ मिळाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शनिवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत स्मृतीने वन डे क्रिकेटमधील महिला फलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तिने तीन स्थानांची झेप घेत अव्वल स्थान गाठले. न्यूझीलंड दौऱ्यात स्मृतीची बॅट चांगलीच तळपली होती. तिने पहिल्या सामन्यात शतकी खेळी करताना जेमिमा रॉड्रीग्जसह 190 धावांची विक्रमी भागीदारी केली होती. 2018 या वर्षातील कामगिरीमुळे तिला आयसीसीने सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारानेही गौरविले होते.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताने 2-1 अशा विजय मिळवला आणि स्मृतीने मालिकावीराचा पुरस्कार जिंकला. स्मृतीने 2018 वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 15 वन डे सामन्यांत दोन शतकं आणि 8 अर्धशतकं झळकावली. आयसीसीच्या क्रमवारीत स्मृतीने ( 751) 70 गुणांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाचीच मेग लॅनिंग 76 गुणांच्या पिछाडीसह तिसऱ्या स्थानावर आहे.
भारतीय संघाची कर्णधार मिताली राज पाचव्या स्थानावर आहे. तिच्या खात्यात 669 गुण असून अव्वल दहा महिला फलंदाजांमध्ये भारताच्या दोनच खेळाडूंचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात नाबाद 81 धावा करणाऱ्या जेमिमा रॉड्रीग्जच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. जेमिमाने 64 स्थानांची भरारी घेताना 61 वा क्रमांक पटकावला आहे. गतवर्षी मार्च महिन्यात वन डे संघात पदार्पण करणाऱ्या जेमिमाने आतापर्यंत केवळ सातच सामने खेळले आहेत.
गोलंदाजीत भारताची फिरकीपटू पूनम यादव व दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी पाच स्थानांची सुधारणा केली आहे. पूनम व दिप्ती अनुक्रमे 8 व 9 व्या स्थानावर आहेत. एकता बिस्तही 9 स्थानांच्या सुधारणेसह 13व्या क्रमांकावर आली आहे.
Web Title: Maharashtra's Smriti Mandhana becomes World No.1 ODI batswoman in ICC ranking
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.