मुंबई : महाराष्ट्राची कन्या स्मृती मानधनाला सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ मिळाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शनिवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत स्मृतीने वन डे क्रिकेटमधील महिला फलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तिने तीन स्थानांची झेप घेत अव्वल स्थान गाठले. न्यूझीलंड दौऱ्यात स्मृतीची बॅट चांगलीच तळपली होती. तिने पहिल्या सामन्यात शतकी खेळी करताना जेमिमा रॉड्रीग्जसह 190 धावांची विक्रमी भागीदारी केली होती. 2018 या वर्षातील कामगिरीमुळे तिला आयसीसीने सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारानेही गौरविले होते.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताने 2-1 अशा विजय मिळवला आणि स्मृतीने मालिकावीराचा पुरस्कार जिंकला. स्मृतीने 2018 वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 15 वन डे सामन्यांत दोन शतकं आणि 8 अर्धशतकं झळकावली. आयसीसीच्या क्रमवारीत स्मृतीने ( 751) 70 गुणांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाचीच मेग लॅनिंग 76 गुणांच्या पिछाडीसह तिसऱ्या स्थानावर आहे.