लंडन - महाराष्ट्राच्या स्मृती मंधानाने इंग्लंडमधील महिला सुपर लीग टी-20मध्ये सर्वात जलद अर्धशतक, सर्वाधिक षटकार, शतक असे विक्रमांचे इमले रचले आहेत. वेस्टर्न स्टॉर्म क्लबकडून प्रतिनिधित्व करताना स्मृतीने एका हंगामात सर्वाधिक धावांचा विक्रमही नावावर केला. या लीगमध्ये खेळणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली.
स्मृतीने सहा सामन्यांत दोन अर्धशतकं आणि एक शतक झळकावले आहे. रविवारी झालेल्या लढतीत वेस्टर्न स्टॉर्मने स्मृती आणि हीदर नाइट यांच्या अर्धशतकी कामगिरीच्या जोरावर यॉर्कशायर डायमंडवर सात विकेट राखून विजय मिळवला. 173 धावांचे लक्ष्य स्टॉर्म संघाने सहज पार केले. 22 वर्षीय स्मृतीने या लढतीत 36 चेंडूंत 56 धावा चोपल्या. या कामगिरीसह तिने तब्बल सहा स्पर्धा विक्रमांची नोंद केली.