मुंबई : सध्याच्या घडीला महेंद्रसिंग धोनी हा भारतीय संघापासून लांब राहत असल्याचे पाहायला मिळत आहे. विश्वचषकानंतर धोनी भारताकडून एकही सामना खेळलेला नाही. धोनी आता निवृत्ती घेणार, अशा अफवा पसरत आहेत. पण धोनी खेळत नसल्याचे कारण निवृत्तीचा विचार नसून दुखापत आहे, हे आता समोर येत आहे.
वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून माघार घेणारा महेंद्रसिंग धोनी नोव्हेंबर महिन्यापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणार अशी शक्यता आहे. पण, तसं होईलच असे नाही आणि त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या आहेत. पण काही महिन्यांपूर्वी धोनीला दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो क्रिकेटपासून दूर आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करत होता. चेन्नईच्या एका सामन्यात धोनीच्या कंबरेला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर स्वरुपाची होती. त्यामुळे धोनीला आयपीएलमधील एका सामन्याला मुकावेही लागले होते. तेव्हा सुरेश रैनाने चेन्नईचे नेतृत्व केले होते.
या दुखापतीवर धोनीने काही दिवसांमध्येच उपचार घेतले आणि तो लगेचच चेन्नईच्या संघाकडून खेळायला तयार झाला. आयपीएलनंतर भारतीय संघ इंग्लंडमध्ये विश्वचषकासाठी जायला निघाला. त्यावेळीही धोनी जायबंदी असल्याचे म्हटले जात होते. पण त्यावेळी या गोष्टीवर कुणीही विश्वास ठेवला नव्हता.
विश्वचषकामध्ये धोनीकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली नाही. विश्वचषकानंतर धोनी भारतीय आर्मीबरोबर जम्मू आणि काश्मीरमध्ये सरावासाठी गेला होता. त्यानंतर तो काही जाहीरातींच्या शूटिंगमध्ये बिझी होता. धोनीने वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणे टाळले. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेबरोबरच्या मालिकांमध्येही धोनी दिसणार नाही.
आयपीएलमध्ये धोनीच्या कंबरेला दुखापत झाली होती. पण त्यापूर्वी धोनीच्या पाठिला आणि मनगटांनाही दुखापत झाली होती. त्यामुळे गेले काही महिने तो क्रिकेटपासून लांब आहे. धोनीने एका इंग्रजी बेवसाईटला ही माहिती दिल्याचे वृत्त दैनिक जागरणने दिले आहे.