रांची: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसमोर एक समस्या उभी राहिली आहे. काही वर्षांपूर्वी धोनीने रांचीमधील डोरंड येथे शिवम प्लाझा या इमारतीत तीन मजले खरेदी केले होते. मात्र, ही इमारत बांधणारी दुर्गा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी दिवाळखोरीत निघाल्यामुळे धोनीवर आपली मालमत्ता गमावण्याची वेळ आली आहे. दुर्गा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कर्ज देणाऱ्या हुडकोने ही संपूर्ण इमारतीचा लिलाव करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे धोनीसमोर मोठी अडचण उभी राहिली आहे.या इमारतीच्या बांधकामासाठी दुर्गा डेव्हलपर्सने हुडकोकडून 12 कोटी 95 लाख रूपयांचे कर्ज घेतले होते. नियोजित आराखड्यानुसार दुर्गा डेव्हलपर्सने 10 मजल्यांची इमारत बांधणे अपेक्षित होते. मात्र, इमारतीचे बांधकाम सुरू असताना दुर्गा डेव्हलपर्स आणि जमिनीच्या मालकामध्ये वाद सुरु झाले. त्यामुळे हुडकोने कर्जाच्या एकूण रक्कमेपैकी 6 कोटी रूपये दिल्यानंतर उर्वरित रक्कम रोखून धरली. त्यामुळे या इमारतीचे केवळ सहा मजलेच पूर्ण होऊ शकले. तर दुसरीकडे कर्जाचे हप्ते थकवल्यामुळे हुडकोने दुर्गा डेव्हलपर्सला दिवाळखोर घोषित केले. आता हुडकोने कर्ज वसुलीसाठी या इमारतीचा लिलाव करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यादृष्टीने या इमारतीचे मूल्यांकनही करण्यात आले आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून लवकरच लिलावाची रक्कम निश्चित होईल. या सगळ्या कायदेशीर वादामुळे महेंद्रसिंह धोनीचे कोट्यवधी रूपये अडकून पडले आहेत. मात्र, दुर्गा डेव्हलपर्सने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. धोनीने शिवम प्लाझा या इमारतीत तीन मजले खरेदी केले होते. या इमारतीमधील दोन प्रस्तावित मजले आम्ही दुसऱ्या प्रकल्पात हस्तांतरित केले आहेत. धोनीने दीड कोटी देऊन खरेदी केलेला तळमजला या इमारतीमध्येच आहे. त्यामुळे या सर्वात आमचा कोणताही दोष नाही. हुडकोच्या काही अधिकाऱ्यांच्या षडयंत्रामुळे आमच्या प्रकल्पाचे बांधकाम रखडले आहे. आम्ही हुडकोकडून कर्जापोटी घेतलेल्या 6 कोटी रूपयांपैकी 3 कोटी परत केले आहेत. त्यामुळे हुडकोने लिलावातून इमारतीचा तळमजला वगळवा, अशी मागणी दुर्गा डेव्हलपर्सने केली आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- कॅप्टन कूल धोनी अडचणीत; 'या' कारणामुळे होणार झारखंडमधील मालमत्तेचा लिलाव
कॅप्टन कूल धोनी अडचणीत; 'या' कारणामुळे होणार झारखंडमधील मालमत्तेचा लिलाव
धोनीने दीड कोटी रुपये मोजून खरेदी केलेला तळमजला या इमारतीमध्येच आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 1:31 PM