नवी दिल्ली - भारताचा माजी कर्णधार धोनीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. रिअल इस्टेटमधील आम्रपाली ग्रुपने धोनीची 150 कोटींची फसवणूक केली आहे. याप्रकरणानंतर धोनीनं कोर्टात धाव घेतली आहे.
इकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, महेंद्रसिंग धोनी सोबतच क्रिकेटर्सचे एंडोर्समेंट पाहणाऱ्या रिती स्पोर्ट्सनेही आम्रपाली विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. रिती स्पोर्ट्सचे संचालक अरुण पांडे यांनी सांगितले की, आम्रपालीने ब्रँडिंग आणि मार्केटिंगचे पैसे दिलेले नाहीयेत. रिती स्पोर्टसचे जवळपास 220 कोटी रुपये येणं बाकी असल्याचंही अरुण पांडे यांनी म्हटलं आहे
आम्रपाली या रिअल इस्टेट कंपनीचा महेंद्रसिंग धोनी हा ब्रँड अॅम्बेसिडर होता. मात्र, या काळात आम्रपालीने आपल्याला मिळणारे 150 कोटी रुपये दिले नसल्याचा आरोप धोनीने केला आहे. तोट्यात सुरु असलेल्या आम्रपाली या रिअल इस्टेट कंपनीकडून आपले पैसे मिळावे यासाठी धोनीने न्यायालयात खटला दाखल केला आहे. गेल्या काही वर्षांपासून आम्रपाली आर्थिक संकटात आहे त्यामुळे कंपनीचे अनेक प्रोजेक्ट्सही रखडले आहेत.