भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर विविध व्यवसायांमधून नव्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. दरम्यान, अशाच एका व्यवसायामध्ये भागीदार असलेल्या जवळच्या मित्राने धोनीला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महेंद्रसिंग धोनीने अरका स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेडचे मिहिर दिवाकर आणि सौम्या विश्वास यांच्याविरोधात रांची कोर्टामध्ये खटला दाखल केला आहे. मिहिर दिवाकर हा धोनीच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे. तसेच तो धोनीचा बिझनेस पार्टनरही राहिलेला आहे. मिहिरने धोनीसोबत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत.
मिहिर दिवाकर याने कथितपणे क्रिकेट अकादमी सुरू करण्यासाठी २०१७ मध्ये महेंद्रसिंग धोनीसोबत एक करार केला होता. मात्र दिवाकर याने करारामध्ये सांगितलेल्या अटींचं पालन केलं नाही. या प्रकरणी अरका स्पोर्ट्सला फ्रँचायझीच्या शुल्काचा भरणा करायचा होता. तसेच कारारातील तरतुदीनुसार नफ्याची वाटणी होणेही अपेक्षित होते. मात्र या करारातील सर्व अटीशर्ती धाब्यावर बसवण्यात आल्या.
महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्ट २०२१ रोजी अरका स्पोर्ट्सकडून अॅथॉरिटी पत्र काढून घेतले होते. त्यानंतर धोनीकडून अनेकदा कायदेशीर नोटिसाही पाठवण्यात आल्या. मात्र काहीच फायदा झाला नाही. त्यानंतर धोनीचे वकील दयानंद सिंह यांनी अरका स्पोर्ट्सने त्यांच्या अशिलाची फसवणूक केल्याचा आणि सुमारे १५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, अशाच प्रकारे भारताचा धडाकेबाज यष्टीरक्षक रिषभ पंत याचीही फसवणूक झाल्याचे समोर आले होते. मृगांक सिंह या क्रिकेटपटूने पंतला लाखोंचा गंडा घातला होता. मात्र मृगांक सिंह याला २५ डिसेंबर रोजी पोलिसांनी अटक केली होती.