मुंबई : महेंद्रसिंग धोनी सारखा कल्पक नेतृत्व असलेला, यष्टिमागे चपळाईने कामगिरी बजावणारा आणि फरफेक्ट मॅच फिनिशर सापडणे, अवघडच आहे. सध्या धोनीच्या रिप्लेसमेंटच्या चर्चा रंगत आहेत, परंतु त्यातही धोनीचे स्थान अबाधित आहेच. वन डेतील त्याचा फॉर्म चिंतेचा विषय असला तरी धोनीच्या निवृत्ती विषयाच्या चर्चांवर दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज फलंदाजाला हसू आवरता आले नाही. धोनी म्हातारा होऊन व्हीलचेअरवर बसला तरी त्याला मी संघात खेळवणार, असे मत व्यक्त करून आफ्रिकेच्या दिग्गजाने टीकाकारांची बोलती बंद केली.
२०१७ च्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेनंतर धोनीच्या कामगिरीचा आलेख उतरता राहिला आहे. मात्र आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग संघाकडून पुनरागमन करताना धोनीने मॅच फिनिशर हा टॅग कायम राखला. तरीही भारतीय संघाकडून त्याच्याकडून सध्या अपेक्षित कामगिरी होताना दिसत नाही. यष्टिमागील त्याच्या कामगिरीला मात्र तोड नाही.
आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज ए बी डिव्हिलियर्सला जेव्हा धोनीच्या रिप्लेसमेंटबद्दल विचारले, तेव्हा तो म्हणाला," तुम्ही सर्व विदूषकासारखा प्रश्न विचारत आहात. मी धोनीला माझ्या संघात प्रत्येक दिवशी, प्रत्येक वर्षाला कायम ठेवीन. तो ८० वर्षांचा झाला आणि तेव्हा तो व्हीलचेअर असला तरी तो माझ्या संघातून खेळेल. त्याच्या कामगिरीला तोड नाही.. त्याच्या विक्रमांवर एकदा नजर टाका. तुम्ही अशा खेळाडूला संघातून वगळू पाहताय?"