मुंबई - आयपीएलच्या पुढच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ कमबॅक करणार आहेत. सट्टेबाजीच्या प्रकरणातील सहभागामुळे या दोन संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. या दोन्ही संघांनी बंदीचा दोनवर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. सध्या या दोन्ही संघातील खेळाडू रायजिंग पुणे सुपरजायंटस आणि गुजरात लायन्स या संघांकडून खेळतात. पुणे आणि गुजरात संघांमध्ये असलेले काही खेळाडू चेन्नई आणि राजस्थानला परत मिळू शकतात.
आयपीएलच्या संचालन परिषदेने तसा प्रस्ताव ठेवला आहे. पुढच्या महिन्यात होणा-या फ्रेंचायजींच्या बैठकीत यावर निर्णय होईल. जर हा प्रस्ताव मान्य झाला तर महेंद्रसिंह धोनी पुण्याऐवजी पुन्हा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसेल. तीन खेळाडू जुन्या संघाकडे कायम ठेवण्याचा प्रस्ताव आहे. यात एक भारतीय आणि दोन परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास सध्या पुणे आणि गुजरातकडून खेळणारे तीन खेळाडू चेन्नई आणि राजस्थानला परत मिळू शकतात.
आम्ही संघमालकांसमोर हा प्रस्ताव मांडू असे आयपीएलच्या संचालन परिषदेच्या सदस्याने मंगळवारच्या बैठकीनंतर सांगितले. या प्रस्तावामुळे मागच्या दोन मोसमात पुण्याकडून खेळणारा धोनी चेन्नईला मिळेल. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी सांगितले की, तीन ते पाच खेळाडून जुन्या संघांकडे कायम ठेवण्याचा प्रस्ताव आहे. फ्रेंचायजीं बहुमताने काय ठरवतात त्यावर अवलंबून आहे.
धोनीचे चेन्नई संघाबरोबर जे नाते आहे तसे नाते पुण्याच्या संघाबरोबर दोनवर्षात जमू शकले नाही. यावर्षीच्या आयपीएलच्या मोसमात पुणे संघाचे मालक हर्ष गोयंका यांनी धोनीच्या कामगिरीवरुन त्याला लक्ष्य केले होते. त्याच्यापेक्षा पुण्याचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ किती सरस आहे अशी टि्वटरवरुन टीकाही केली होती.
आयपीएलच्या सुरूवातीला पुण्याच्या मुंबईवरील पहिल्या विजयानंतर हर्ष गोयंका यांनी धोनीच्या चाहत्यांचा रोष ओढवून घेतला होता. मॅच विनिंग खेळी करणा-या स्मिथचं त्यांनी कौतूक केलं होतं. यावेळी त्यांनी, "स्मिथने दाखवून दिलं कोण आहे जंगलचा राजा, आपल्या कामगिरीने त्याने धोनीला पूर्णतः झाकोळलं, स्मिथची कर्णधारपदी निवड करण्याचा निर्णय योग्यच होता" असं ट्विट केलं होतं. त्यांच्या या ट्विटनंतरही धोनीच्या चाहत्यांनी गोयंका यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. वाढती टीका पाहून गोयंका यांनी ते ट्विट नंतर डिलीट केलं.