भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याला निवृत्तीचा सामना खेळण्याची संधी मिळायला हवी, असे अजूनही त्याच्या चाहत्यांना वाटते. भारताला दोन वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणाऱ्या कॅप्टन कूल धोनीनं 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून अखेरचा वन डे सामना खेळला. त्यानंतर कोरोना व्हायरसमुळे ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित करावा लागला. त्यामुळे धोनी पुन्ही ब्लू जर्सीत दिसण्याच्या आशाही मावळत गेल्या अन् अखेर 15 ऑगस्ट 2020 ला धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधारासाठी बीसीसीआयनं निरोपाचा सामना आयोजित करावा अशी मागणी आजही होत आहे आणि त्यात एका फोटोमुळे धोनीच्या चाहत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी सोमवारी टीम इंडियाच्या रेट्रो जर्सीत दिसला. धोनीनं 7 क्रमांकाची रेट्रो जर्सी घातलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले अन् धोनी निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. धोनीला पुन्हा ब्लू जर्सीत पाहून त्याचे फॅन्सही भावुक झाले अन् सोशल मीडियावर #MSDhoni हा ट्रेंड सुरू झाला. पण, धोनीनं निरोपाचा सामना खेळण्यासाठी ही तयारी केलेली नाही. एका जाहिरातीच्या चित्रिकरणासाठी धोनीनं ही तयारी केली आहे.
महेंद्रसिंग धोनीनं ९० कसोटींत ४८७६ धावा केल्या आणि त्यात ६ शतकं व ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. ३५० वन डेत १०७७३ धावा आणि त्यात १० शतकं व ७३ अर्धशतकांचा समावेश आहे. ९८ ट्वेंटी-२०त त्याच्या नावावर १६१७ धावा आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं २००७चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, २०११चा वन डे वर्ल्ड कप आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा जिंकणारा तो जगातील पहिला व एकमेव कर्णधार आहे.