नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर नाही. त्यामुळे सध्या धोनी आपल्या कुटुंबियांना वेळ देत आहे. त्याचबरोबर आपली हौसही तो पूर्ण करत आहे. काही दिवसांपूर्वी धोनी कबड्डीच्या मैदानात उतरला होता. आता तर त्याने टेनिस कोर्टातही आपला जम बसवला आहे.
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. पण धोनीची भारतीय ट्वेन्टी-20 संघात निवड करण्या आलेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेत भारताला 1-1 अशी बरोबरी साधता आली होती. त्यानंतर आता 6 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पण धोनी कसोटी संघातही नसल्याने सध्या एक महिना तरी त्याला विश्रांती मिळणार आहे.
झारखंडमधील कंट्री क्रिकेट क्लबने एका टेनिस स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत धोनी पुरुष दुहेरी विभागात टेनिस खेळायला उतरला. यावेळी धोनीला त्याचा मित्र सुमितने साथ दिली. धोनी आणि सुमित यांचा सामना ब्रजेश आणि पवन यांच्याबरोबर झाला. क्रिकेटमध्ये धोनी जसा माहीर आहे, तसा तो टेनिसमध्येही असल्याचे यावेळी पाहायला मिळाले. कारण धोनी आणि सुमित यांनी प्रतिस्पर्ध्यांवर 6-1, 6-1 असा सहज विजय मिळवला. त्यामुळे आता धोनी टेनिसमध्ये करिअर करणार का, अशा चर्चांनाही उत आला आहे.