गेल्या काही दिवसांत आयपीएलमध्ये अनेक जबरदस्त सामने रंगले. वानखेडे स्टेडियमवरील मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब सामन्याने सर्वांनाच खिळवून ठेवले. पंजाबने उभारलेल्या १९७ धावांच्या भल्यामोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईकरांची स्थिती बिकट झाली होती. मात्र, हंगामी कर्णधार किएरॉन पोलार्ड याने अविश्वसनीय खेळी करत, हा सामना अक्षरश: खेचून आणला.
या सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी जयपूर येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स सामन्यानेही सर्वांचे लक्ष वेधले. चेन्नईनेही मुंबईप्रमाणेच अखेरच्या चेंडूवर विजय मिळविला. निर्धारित लक्ष्य फार मोठे नव्हते. मात्र, आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर चेन्नईचा संघ अडचणीत आला होता. हा सामना लक्षात राहिला, तो अखेरच्या षटकातील नाट्यपूर्ण घडामोडीमुळे. अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर रवींद्र जडेजाने षटकार ठोकला. यानंतर, अखेरच्या चेंडूवर न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरनेही षटकार ठोकत चेन्नईच्या विजयावर शिक्का मारला.
लोकेश राहुलने मुंबईविरुद्ध शानदार शतक ठोकले आणि यासह त्याने विश्वचषक स्पर्धेसाठी आपली दखल घेण्यासही भाग पाडले. याशिवाय ख्रिस गेलने झंझावाती फटकेबाजी केली. गेल्या सत्रात अपयशी ठरल्यानंतर पोलार्डवर शंका निर्माण झाली होती. मात्र, पंजाबविरुद्ध त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते कौतुकास्पद आहे.
चेन्नई-राजस्थान यांच्यातील लढतीत मोठे नाट्य घडले.चेन्नईला अखेरच्या षटकात १८ धावांची गरज असताना, पहिलाच चेंडू जडेजाने षटकार ठोकला. यानंतर, स्टोक्सने एक फुलटॉस चेंडू टाकला, जो पंचांनी नो बॉल ठरविला. मात्र, लेग पंचांनी तो नो बॉल रद्द करण्यास भाग पाडले. यामुळे चक्क धोनी थेट मैदानावर आला आणि त्याने पंचांशी हुज्जत घातली. हे सर्वांसाठीच अनपेक्षित होते. धोनीवर मोठी टीकाही झाली. हा सामना अत्यंत दबावपूर्ण होता. माझ्यामते, या प्रकरणात पंचांकडून चूक झाली, पण पंचांची चूक असली म्हणजे, खेळाडूने थेट मैदानावर जाऊन जाब विचारणे असा होत नाही.
-अयाझ मेमन संपादकीय सल्लागार
Web Title: Mahendra Singh Dhoni's act was unexpected!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.