नवी दिल्ली : ‘दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन आता जवळपास अशक्यच आहे,’ असे मत भारतीय संघाचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेद्र सेहवाग याने बुधवारी व्यक्त केले.क्रिकेटपटू ते समालोचक असा प्रवास करणारा सेहवाग म्हणाला, ‘माझ्या मते, धोनी आता मागे पडला. निवडकर्त्यांचे लक्ष भविष्यातील संघबांधणीकडे आहे. भारतीय क्रिकेटला धोनीचा पर्याय गवसण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.’ स्वत:च्या शैलीत वीरू पुढे म्हणाला, ‘आता धोनी कुठे फिट बसणार? रिषभ पंत आणि लोकेश राहुल हे भारतीय क्रिकेटच्या ‘थिंक टँक’च्या योजनेचा भाग बनले आहेत. विशेषत: राहुलने फलंदाजीसह यष्टिरक्षणातही चुणूक दाखवून संघ व्यवस्थापनापुढे पर्याय मांडला. अशावेळी धोनीला संघात स्थान मिळविणे सोपे असेल, असे मुळीच वाटत नाही.’नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यात एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत भारतीय संघाची दारुण अवस्था झाली. यासंदर्भात सेहवाग म्हणाला, ‘भारतीय संघाच्या तुलनेत न्यूझीलंड संघ एकदिवसीय आणि कसोटीत घरच्या मैदानावर सरस होता, यात शंका नाही. टी२० तही त्यांना अत्यंत थोड्या फरकाने पराभवाचे तोंड पहावे लागले होते. क्रिकेटमधील झटपट प्रकारातील कामगिरीच्या आधारे भारतीय संघाला बलाढ्य दावेदार संबोधणे मोठी चूक होती.’ (वृत्तसंस्था)विराटच्या फॉर्मची काळजी नको...विराट कोहलीच्या फॉर्मबाबत सेहवाग म्हणाला, ‘विराटचा क्लास अप्रतिम आहे. फॉर्म कधीही सातत्यपूर्ण नसतोच. कधीकधी खराब पॅच येतोच. सचिन तेंडुलकर, स्टीव्ह वॉ, जॅक कॅलिस, रिकी पाँटिंग यांच्यासारखे महान खेळाडू अनेकदा बॅडपॅचमधून गेले आहेत.’हार्दिकमुळे संघाला मजबुतीसेहवागने हार्दिक पांड्याच्या पुनरागमनाबाबत सांगितले की,‘ हार्दिकच्या पुनरागमनामुळे भारतीय संघ आणखी बलाढ्य होईल आणि संघाच्या कामगिरीत याचा फरक जाणवेल. हार्दिकसारखा अष्टपैलू परतल्यामुळे संघातील संतुलन बदलेल. दुखापतीमुळे हार्दिकला विश्रांतीची पुरेशी संधी मिळाली. तो ताजातवाना होऊन परतला आहे. त्याची कामगिरी पुढे आणखी उंचावेल, यात शंका नाही.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- महेंद्रसिंग धोनीचे पुनरागमन आता अशक्यच - वीरेंद्र सेहवाग
महेंद्रसिंग धोनीचे पुनरागमन आता अशक्यच - वीरेंद्र सेहवाग
धोनी आता मागे पडला. निवडकर्त्यांचे लक्ष भविष्यातील संघबांधणीकडे आहे. भारतीय क्रिकेटला धोनीचा पर्याय गवसण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 4:46 AM