कटक - भारताने श्रीलंकेविरोधातील पहिल्या टी-20 सामन्यात 93 धावांनी विजय मिळवला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत 20 ओव्हर्समध्ये तीन विकेट्स गमावत 180 धावांचं आव्हान दिलं होतं. पण श्रीलंकेचा संघ फक्त 87 धावांमध्येच गारद झाला. श्रीलंकेच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी धूळ चारली, मात्र यामध्ये विकेटकीपर महेंद्रसिंग धोनीनेही तितकीच महत्वाची भूमिका निभावली. महेंद्रसिंग धोनीमुळे चार फलंदाजांना तंबूत परतावं लागलं. यासोबत महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 200 चा टप्पा पार केला आहे.
200 खेळाडूंना बाद करणारा महेंद्रसिंग धोनी जगातील दुस-या क्रमांकाचा विकेटकीपर ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर पाकिस्तानचा विकेटकीपर कामरान अकमल आहे. कामरान अकमलने 207 खेळाडूंना बाद केलं आहे. धोनी कामरान अकलमच्या फक्त सात विकेट मागे आहे. श्रीलंकेविरोधातील उर्वरित दोन टी-20 सामन्यात धोनीने आपला परफॉर्मन्स असाच कायम ठेवला तर कामरान अकलमचा रेकॉर्ड तोडायला वेळ लागणार नाही. धोनीनंतर श्रीलंकेचा माजी विकेटकीपर कुमार संगकारा आहे. त्याने 192 विकेट घेतल्या होत्या. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
पहिल्या सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास महेंद्रसिंग धोनीने सुरुवातीला चहलच्या गोलंदाजीवर श्रीलंकेचा ओपनर उपुल थरंगाचा झेल घेत त्याला बाद केलं. यानंतर परेराचा कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर झेल घेत त्याला माघारी धाडलं. गुणरत्नेला चहच्या गोलंदाजीवर स्टम्पिंग करत फक्त एका धावेवर आऊट केलं. यानंतर कर्णधार थिसाराला तीन धावांवर असताना स्टम्पिंग करत आऊट केलं. अशाप्रकारे धोनीने पहिल्या सामन्यात चार श्रीलंकन फलंदाजांना माघारी धाडलं.
पहिल्या टी -20 सामन्यामध्ये भारतीय फिरकी गोलंदाजांच्या जाळ्यात श्रीलंकेचे फलंदाज अडकले. भारतीय संघानं केलेल्या सांघिक कामगिरीच्या बळावर भारतानं 93 धावानं विजय मिळवला आहे. भारतीय संघाचा हा टी-20 च्या इतिहासातीस सर्वात मोठा विजय आहे. भारताने उभारलेल्या १८० धावांचा पाठलाग करताना लंकेचा डाव १६ षटकांत केवळ ८७ धावांत संपुष्टात आला. युझवेंद्र चहल (४/२३), हार्दिक पांड्या (३/२९) यांनी अचूक मारा करत लंकेची दाणदाण उडवली. चहलला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
बाराबती स्टेडियमवर लंकेने आक्रमक सुरुवात केली खरी, मात्र जयदेव उनाडकटने निरोशन डिकवेला (१३) याला बाद करून लंकेच्या फलंदाजीला सुरुंग लावला. यानंतर ठराविक अंतराने लंकेचे फलंदाज बाद झाले. अनुभवी सलामीवीर उपुल थरंगा याने १६ चेंडंूत एक चौकार व २ षटकारांसह सर्वाधिक २३, तर कुशल परेराने २८ चेंडूत १९ धावांची खेळी केली. याशिवाय, अँजेलो मॅथ्यूज (१), असेला गुणरत्ने (५), दासून शनाका, थिसारा परेरा (३) हे सपशेल अपयशी ठरले. चहल व हार्दिक यांनी भेदक मारा करत लंकेच्या फलंदाजीला खिंडार पाडले. तत्पूर्वी, सलामीवीर लोकेश राहुलचे (६१) शानदार अर्धशतक व महेंद्रसिंग धोनी - मनीष पांडे यांची नाबाद अर्धशतकी भागीदारी या जोरावर भारताने ३ बाद १८० धावांची मजल मारली. राहुल अर्धशतक झळकावून बाद झाल्यानंतर धोनी - पांडे यांनी ६८ धावांची नाबाद भागीदारी करून भारताला मजबूत धावसंख्या उभारली. मॅथ्यूजने कर्णधार रोहित शर्माला (१७) बाद करून भारताला ५व्या षटकात मोठा धक्का दिला. यानंतर लोकेश राहुलने सर्व सूत्रे आपल्याकडे घेत ४८ चेंडूत ७ चौकार व एका षटकारासह ६१ धावांची निर्णायक खेळी केली. त्याने श्रेयस अय्यरसह (२४) दुसºया विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. अय्यर व राहुल ११ धावांच्या फरकाने बाद झाल्यानंतर धोनी - पांडे यांनी लंका गोलंदाजीचा समाचार घेतला.