भारतीय संघाने विश्वचषक-2023 मध्ये आतापर्यंत खेळलेले सर्वच्या सर्व पाचही सामने जिंकले आहेत. भारतीय संघ पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाची ही कामगिरी बघता, क्रिकेट क्षेत्रातील अनेक दिग्गज भारतीय संघ 2023 च्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असल्याचे म्हणत आहेत. भारतीय संघाने 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने मात करत आपल्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात केली होती. यानंतर भारतीय संघाने अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि नंतर न्यूझीलंड संघाचाही पराभव केला आहे.
यावेळी भारतीय संघाने विश्वचषक जिंकला तर भारत तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकेल. यापूर्वी भारताने 1983 साली पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. यानंतर 2011 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता.
काय म्हणाला धोनी - महेंद्र सिंह धोनीला विश्वचषक-2023 मध्ये भारतीय संघाच्या विजयासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना धोनी म्हणाला, "भावना समजून घ्या, हा चांगला संघ आहे, संघाचा समतोलही उत्तम आहे, सर्वजण चांगले खेळत आहेत, यापेक्षा मी अधिक काहीही बोलणार नाही, समजणाऱ्यांना इशारा पुरेसा आहे."
यापूर्वी, विश्वचषक-2023 मधील भारतीय संघाच्या विजयासंदर्भात अनेक क्रिकेट पंडितांनी आपली मते मांडली आहेत. यातच, भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीनेही आपले मत मांडले आहे.