Join us  

MS Dhoni Retirement: "30 लाख रुपये कमवून रांचीला परतणार होता धोनी!"

धोनीच्या नेतृत्वात भारताने 2007 मध्ये टी -20 विश्वचषक आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 9:44 PM

Open in App
ठळक मुद्देगेल्या अनेक दिवसांपासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू होत्या.धोनीने 90 कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना 38.09 च्या सरासरीने 6 शतके व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत.

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात अवघ्या 30 लाखांची कमाई करून आपल्या गावी रांचीमध्ये शांततेत राहायची इच्छा होती. हा खुलासा भारतीय संघाचा माजी सलामीवीर वसीम जाफरने केला आहे.

धोनीच्या नेतृत्वात भारताने 2007 मध्ये टी -20 विश्वचषक आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक असल्याचे मानले जाते. क्रिकेट खेळून 30 लाख रुपये कमवायचे आहेत, असे धोनीने सांगितल्याचे वसीम जाफरने म्हटले होते.

जाफरने काही दिवसांपूर्वी ट्विटर लिहिले होते की, "मला आठवते जेव्हा तो (धोनी) भारतीय संघात पहिल्या किंवा दुसर्‍या वर्षी होता. तेव्हा तो म्हणाला होता, क्रिकेट खेळून 30 लाख रुपये कमवायचे आहेत, जेणेकरून रांचीमध्ये शांततेत जीवन जगता येईल."

जगातील महान कर्णधारांपैकी एक असलेल्या धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर धोनी स्पर्धात्मक क्रिकेट खेळला नव्हता. आता तो इंडियन प्रीमियर लीगमधून (आयपीएल) खेळणार आहे.

धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फोटो पोस्ट केले आहे. तसेच, या व्हिडीओला 'मैं पल दो पल का शायर हूँ,' हे गाणं शेअर करत निवृत्तीची घोषणा केली आहे. "तुम्ही दिलेलं प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभारी आहे…1929 (म्हणजे संध्याकाळी 7.30) पासून मला निवृत्त समजावे," अशी कॅप्शन त्याने या पोस्टला दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान, धोनीने 90 कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना 38.09 च्या सरासरीने 6 शतके व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. तर 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 50.57 च्या धडाकेबाज सरासरीने 10 हजार 773 धावा फटकावल्या. त्यामध्ये 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. 

याचबरोबर, ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये माहीने 98 सामन्यांत 1617 धावा केल्या. फलंदाजीसोबतच धोनीने यष्टीमागूनही त्याने भारतीय संघाला भरभरून योगदान दिले. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, तर वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.

टॅग्स :एम. एस. धोनी