डरबन - दक्षिण आफ्रिकेत पहिल्या वनडेमध्ये डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने दमदार कामगिरी केली. या कामिगिरीचे श्रेय त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दिले आहे. स्टंम्पस पाठी उभे राहून धोनीने मोलाचे मार्गदर्शन केले. धोनीच्या त्या सल्ल्यांमुळे माझे 50 टक्के काम कमी झाले या शब्दात कुलदीपने धोनीचे कौतुक केले असून आभार मानले आहेत. काल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये कुलदीप आणि यझुवेंद्र चहल या जोडीने पाच विकेट काढल्या आणि दक्षिण आफ्रिकेला आठ बाद 269 धावांवर रोखण्याची महत्वाची भूमिका बजावली.
भारताने सहा विकेट राखून हा सामना जिंकताना सहा सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. कुलदीपने 10 षटकात 34 धावा देत तीन विकेट काढल्या. जेपी डयुमिनी, डेव्हीड मिलर आणि ख्रिस मॉरीस या आफ्रिकेच्या महत्वाच्या फलंदाजांना त्याने आपल्या फिरकीच्या जाळयात अडकवले. दक्षिण आफ्रिकेत प्रथमच खेळत असल्यामुळे नेमकी कशी गोलंदाजी करावी याविषयी माझ्या मनात थोडा गोंधळ होता. कारण माझ्यासाठी हा नवीन अनुभव आहे.
वारा चांगला होता आणि चेंडूही ब-यापैकी वळत होता. त्यामुळे गोलंदाजी करताना काय बदल करायचे याविषयी संभ्रम होता. त्यावेळी मी माही भायकडे सल्ला मागितला त्याने मला जशी गोलंदाजी करतो तशी गोलंदाजी करायला सांगितली. तो मला वेळोवेळी स्टंम्पसपाठून मार्गदर्शन करत होता. त्यामुळे माझे काम सोपे झाले असे यादवने सांगितले.
जेव्हा तुमच्या संघात विराट आणि धोनी असे महान क्रिकेटपटू असतात. एक संघाचे नेतृत्व करतोय दुसरा नेतृत्व करुन झाला आहे. त्यावेळी तुम्हाला मदत मिळते. जेव्हा तुम्ही फिरकी गोलंदाजी करता तेव्हा महेंद्रसिंह धोनीने तुमचे 50 टक्के काम केलेले असते. धोनी इतका क्रिकेट खेळला आहे कि, त्याला फलंदाजांचा गाढा अभ्यास आहे असे कुलदीप पत्रकारपरिषदेत म्हणाला.