भारतानं ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला. काही सीनिअर खेळाडू दुखापतग्रस्त असतानाही कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम कामगिरी करत भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाच्या संघाला धुळ चारली. यानंतर भारतीय संघ भारतात परतल्यानंतर संघातील सर्वच खेळाडूंचं जंगी स्वागतही करण्यात आलं. महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा हेदेखील भारतीय संघाच्या या विजयावर अतिशय खुष आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेत पदार्पण करणाऱ्या सहा खेळाडूंना महिंद्राची नवी SUV थार गिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आनंद व्यक्त करत ही माहिती दिली. एकीकडे भारतीय संघाच्या खेळाडूंना या ऐतिहासिक विजयानंतर जगभरातून शुभेच्छा मिळत आहेत. तर दुसरीकडे आनंद महिंद्रा यांनी या खेळाडूंना एसयूव्ही भेट म्हणून देत नव्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल आणि नवदीप सैनी या सहा खेळाडूंना आनंद महिंद्रांकडून भेट मिळणार आहे.
७० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला भारताने ऑस्ट्रेलियाची ३२ वर्षांची मक्तेदारी मोडीत काढून सलग दुसऱ्यांदा त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम केला. गाबा मैदानावर आतापर्यंत २५० पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य कोणत्याही संघाला गाठता आले नव्हते. १९५१ मध्ये वेस्टइंडीजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे २३६ धावांचे लक्ष्य गाठले होते. मात्र, भारतीय संघाने ऐतिहासिक विजयासह वेस्ट इंडिजचा ७० वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला.