नवी दिल्ली : ‘भारताच्या एकदिवसीय संघात स्थान मिळवणे हे माझे मुख्य लक्ष्य असून नक्कीच मी एकदिवसीय संघात पुनरागमन करू शकतो. शिवाय संघाच्या गरजेनुसार कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यासही मी सज्ज आहे,’ असे भारताचा भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणे याने म्हटले.
कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या मधल्या फळीला मजबुती देणारा रहाणे २०१८ सालापासून एकदिवसीय संघातून बाहेर आहे. रहाणेने आतापर्यंत ९० एकदिवसीय सामन्यांतून ३५.२६च्या सरासरीने २,९६२ धावा फटकावल्या आहेत. यापैकी ८४३ धावा या त्याने चौथ्या क्रमांकावर खेळताना ३६.६५ची सरासरी राखली आहे. तसेच त्याने सलामीला खेळताना त्याने १,९३७ धावा काढताना तीन शतकेही झळकावली आहेत. मात्र एकदिवसीय सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतरही २०१८मध्ये त्याला संघातील स्थान गमवावे लागले. मात्र आता त्याने एकदिवसीय संघात पुनरागमन करण्याचे मुख्य लक्ष्य बाळगले आहे.